मुंबई - सोलापुरातील टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केलेल्या चौकडीच्या मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने मस्जिद बंदर येथून मुसक्या आवळल्या आहेत. आमृद्दीन जहीर शेख (वय - २४), नाजीर ओनीस शेख (वय - ३५), साजन मोहबुल शेख(वय - ३४) आणि सौदागर समशेर शेख (वय - ३२) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
झारखंड येथील हि टोळी मे महिन्यात अधिक सक्रिय होत होती. उन्हाळ्यात व्यवसायाच्या बहाण्याने राज्यात येतात आणि पळत ठेवून परिस्थितीचा अंदाज घेऊन हि टोळी बँक लुटायची. यंदा मे महिन्यात हि चौकडी सोलापुरात आली होती. आंबे विकण्याच्या बहाण्याने भाड्याने गाळा या चौकडीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोरच घेतला होता. काही दिवस बँकेची सर्व माहिती गोळा करून नंतर चोरट्यांनी बँकेची स्ट्रॉगरूम फोडत होते. मात्र, त्यांना अपयश आले. चोरट्यांचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यानंतर बँकेने तक्रार दाखल केल्याने टेंभुर्णी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा तपास सुरु केला. याप्रकरणी त्यांनी मुंबईच्या खंडणी विरोधी पथकही मदत मागितली होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने तपासाअंती मस्जिद बंदर येथून या चार आरोपींना अटक केली.