पुणे : आरोग्य विभाग तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या (म्हाडा) भरती परीक्षेतील पेपरफुटी उजेडात आल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने आता शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) पेपरफुटी उघडकीस आणली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे याच्यासह तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही याप्रकरणी अटक झाली आहे.
परीक्षेत तीन वर्षांपासून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. न्यायालयाने दोघांना २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पत्रकार परिषदेत घोटाळ्याची माहिती दिली. हॉल तिकिटे, उमेदवारांची यादी सापडली जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा महाराष्ट्र संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याला म्हाडा पेपरफुटी प्रकरणात अटक केल्यावर त्याची घरझडती घेण्यात आली. त्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील हॉल तिकिटे तसेच उमेदवारांची नावे असलेली यादी सापडली होती.
घराच्या झाडाझडतीत ८८ लाखांची रोकड जप्त
- सुपेच्या घरझडतीत एक कोटी ७० लाख रुपयांपैकी ८८ लाख ४९ हजार ५०० रुपये रोकड, ८ लाख १५ हजार रुपयांचे दागिने व ठेवी असा ९६ लाख ६४ हजार ५८० रुपयांचा ऐवज जप्त केला.
- सुपेला एक कोटी ७० लाख रुपये, डॉ. प्रीतीश देशमुख तसेच अभिषेक सावरीकर यांना प्रत्येकी सव्वा कोटी रुपये मिळाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यात आणखी काहींना अटक होऊ शकते.
पैसे स्वीकारून निकालात फेरफार
- सुपे आणि सावरीकर यांनी २०१९-२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेतील काही उमेदवारांकडून पैसे स्वीकारून निकालात फेरफार केले.
- चौकशीत देशमुखसह अटकेतील त्याचे साथीदार संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांनी एजंटांमार्फत सुपे, सावरीकर यांच्याबरोबर गैरव्यवहार केल्याचे उजेडात आले.
- गैरव्यवहाराची कबुली दिल्यानंतर सुपे यांना अटक केल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.
चौकशीसाठी समिती स्थापन : शिक्षणमंत्रीटीईटी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून काही दिवसांतच अहवाल सादर केला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.