- नरेश डोंगरे नागपूर - महामारीच्या रूपाने धडकलेल्या कोरोनाला अटकाव करण्यास साहाय्यभूत ठरू पाहणाऱ्या सॅनिटायजरमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी नागपुरात एकाला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. मात्र, त्याने आपल्या मोबाईलमधून या रॅकेटशी संबंधित डाटा डीलिट केल्याने या रॅकेटचा छडा लागण्याची शक्यता मावळली आहे. वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घालून रॅकेटच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न केल्यास अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.सर्वत्र प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी सॅनिटायजर उपयुक्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी अन्य उपायांसोबतच सॅनिटायजरचा वेळोवेळी वापर करण्याचाही सल्ला दिला जात आहे. त्यामुळे बाजारात सॅनिटायजरची प्रचंड मागणी वाढली आहे. ती लक्षात घेत समाजकंटकांनी बनावट सॅनिटायजरची निर्मिती करून ते विकण्याचा सपाटा लावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे बनावट सॅनिटायजर निर्माण करणाऱ्या रॅकेटने त्यात मोठ्या प्रमाणात स्पिरिटचा वापर केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी जप्त केलेल्या सॅनिटायजरमध्ये स्पिरिट, विशिष्ट रसायन आणि पाण्याचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे. नामांकित कंपन्यांकडून निर्मित सॅनिटायजरला खाली टाकून माचिसची काडी उगाळल्यास ते काही वेळपर्यंत जळते. मात्र, रॅकेटने तयार केलेल्या सॅनिटायजरमध्ये मोठ्या प्रमाणात स्पिरिट अन् कापरासारखा पदार्थ वापरल्यामुळे ते बराच वेळपर्यंत जळत राहते. या रॅकेटने नागपूरसह विविध शहरात बनावट सॅनिटायजरची प्रचंड प्रमाणात विक्री केली आहे. कोरोनाला रोखण्याऐवजी नागरिकांच्या आरोग्याला अपाय पोहचवणारे हे बनावट सॅनिटायजर एमआयडीसी पोलिसांनी जप्त करून शुक्रवारी सायंकाळी विकी खानचंदाणी याला ताब्यात घेताच रॅकेट सतर्क झाले. नागपुरातील रॅकेटचा सदस्य जितेंद्र मुलानी याने रातोरात त्याच्याकडचा साठा कुठे हलविला हे कळण्यास मार्ग नाही. त्याने त्याच्या मोबाईलमधील डाटाही पूर्ण नष्ट केला. आपण हे फेसबुकच्या माध्यमातून मागितल्याची दिशाभूल करणारी माहिती तो पोलिसांना देत आहे. बाकीचा साठा कुठे आहे, ते तो सांगायला तयार नाही. नागपुरात बॉटलिंग !सूत्रांच्या माहितीनुसार, हे रॅकेट नेमके कोण आणि कुठून संचलित करीत आहे, ते अजून उघड झाले नाही. मात्र, बनावट सॅनिटायझरचा कच्चा माल मध्य प्रदेशातून नागपुरातून पाठविला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही या रॅकेटचे नेटवर्क असून, नागपुरात मोठ्या प्रमाणात बॉटलिंग करून ते बाजारात पाठविले जात असल्याचीही माहिती पुढे आली आहे. या रॅकेटने अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझर विकण्यासाठी ठेवल्याचीही माहिती आहे. पोलिसांच्या मर्यादा, तपासात अडचणविशेष म्हणजे, ज्या कलमानुसार खानचंदानी आणि मुलानीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात त्यांना अटक केली जाऊ शकत नसल्याचे पोलीस सांगतात. अटकच केली गेली नसल्याने त्यांच्याकडून पाहिजे त्या पद्धतीने गुन्ह्याची माहिती काढून घेण्यात पोलिसांना अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालण्याची गरज आहे. तसे झाले तरच महामारी म्हणून घोषित झालेल्या आणि त्यामुळे आधीच भयभीत असलेल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाºया समाजकंटकांवर कायद्याचा चाबूक ओढला जाऊ शकतो.
बनावट सॅनिटायजर विकणारे रॅकेट सक्रिय, सूत्रधार अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 11:41 PM