मुंबई : बनावट मास्क बनविणाऱ्या उत्तर प्रदेश येथील फॅक्टरीवर गुन्हे शाखेने छापा टाकून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मोहम्मद सोहेल मोहम्मद इद्रीस अन्सारी (३१) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेचा कक्ष तीनने ही कारवाई केली. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलैला लोअर परळ येथे केलेल्या कारवाईत २१ लाख ३९ हजारांचा बनावट मास्कचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन एकाला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून उत्तर प्रदेशचे कनेक्शन समाेर आले. त्यानुसार पथकाकडून बनावट मास्क बनविणाऱ्या उत्तर प्रदेश येथील गाजियाबाद फॅक्टरीवर छापा टाकण्यात आला. तेथे नामांकित कंपनीच्या एन ९५ मास्कचा बनावट साठा सापडला. पथकाने याप्रकरणी अन्सारीला अटक करून मास्कच्या ५ हजार नग साठ्यासह एकूण ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
बनावट मास्क बनवणाऱ्या उत्तर प्रदेशातील फॅक्टरीवर छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 6:07 AM