नवी मुंबई : एपीएमसीमधील सतरा प्लाझा इमारतीमध्ये चालणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. छाप्या वेळी त्याठिकाणी मुला मुलींची जंगी पार्टी सुरु असल्याचे आढळून आले. याप्रकरणी हुक्का पार्लर मालकावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
एपीएमसी मधील सतरा प्लाझा हि व्यावसायिक इमारत त्याठिकाणी चालणाऱ्या हुक्का पार्लर मुळे शहरात चर्चेची ठरत आहे. कॅफेच्या नावाखाली त्याठिकाणी हुक्का पार्लर चालवले जात आहेत. त्यांच्याकडून तरुण तरुणींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात असतात. अशातच शनिवारी संध्याकाळी तिथल्या पाम अटलांटिस या हुक्का पार्लर मध्ये मोठी पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाने संध्याकाळच्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी शंभर हुन अधिक तरुण तरुणी हुक्का पार्टी करताना आढळून आले. त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोशल मिडियाद्वारे या पार्टीचे निमंत्रण देण्यात आले होते. तर हुक्का पार्लर चालक विरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीर पर्यंत सुरु होते. या कारवाईने सतरा प्लाझा मध्ये चालणारे अवैध धंदे पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. त्याठिकाणी यापूर्वी देखील अनेकदा कारवाया झालेल्या आहेत. यानंतरही अवैध धंद्यांना आळा बसू शकलेला नाही.