नवी मुंबई : पामबीच रोडवरील सत्रा प्लाझा इमारतीमधील हुक्का पार्लरवर २६ जानेवारीला पहाटे पोलिसांनी छापा मारला. पोलिसांच्या भीतीमुळे हुक्का पार्लरच्या चालकांनी कडी लावून ग्राहकांसह स्वत:लाही कोंडून घेतले होते. पोलिसांनी दोन तास दरवाजा ठोठावल्यानंतर अखेर सर्वांना ताब्यात घेण्यात यश आले. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये निकुंज सावला व सुमित सुुर्वे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
एपीएमसी पोलीस स्टेशनपासून जवळच असलेल्या सत्रा प्लाझा इमारतीमध्ये कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर चालविण्यात येत आहेत. या कॅफेमधून मध्यरात्रीपर्यंत तरुण - तरुणी धूम्रपान करत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. शनिवार, रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी पहाटेपर्यंत कॅफे सुरू ठेवले जात असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधून ग्राहक येऊ लागले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीनंतरही येथील ॲटलँटिक कॅफे सुरू असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. पोलिसांनी तत्काळ या तक्रारीची दखल घेऊन १ वाजण्याच्या सुमारास कॅफेवर छापा मारण्याची कारवाई सुरू केली. परंतु पोलीस आल्याची माहिती मिळताच चालकांनी ग्राहकांसह आतमध्ये कोंडून घेतले. पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगूनही आतमधून कोणीही प्रतिसाद दिला नाही. तब्बल दोन तास पोलिसांचे पथक दरवाजाच्या बाहेर व इमारतीच्या परिसरात तळ ठोकून होते.
पोलिसांनी कॅफेच्या बाहेर ठाण मांडल्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चालकांपैकी एक जण पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर कॅफेचा दरवाजा उघडण्यात आला. आतमध्ये १६ ग्राहक दाटीवाटीने थांबल्याचे निदर्शनास आले. यामध्ये तरुण, तरुणींचाही समावेश होता. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करत नियमांचे उल्लंघन करून आरोग्यास धोका निर्माण केल्याचा व धूम्रपान करण्याच्या उद्देशाने गर्दी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मोक्कासह हद्दपारीच्या प्रस्तावाचा निर्णय प्रलंबितगुन्हा दाखल केलेला एक आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी ठाणे व इतर ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत. ठाण्यामधून त्याला हद्दपारही केले होते. नवी मुंबई पोलिसांनीही त्याला हद्दपार करण्यासाठी व मोक्का लावण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविला होता. अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.