लातूर : हरंगुळ (बु.) परिसरात असलेल्या दाेन हाॅटेल, बारवर लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाने धाडी टाकल्या आहेत. यावेळी दारुच्या साठ्यासह एकूण ५ लाख ७२ हजार ३७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सहाव जणांना पथकाने बुधवारी अटक केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाताळ आणि नववर्षांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
लातूर येथील राज्य उत्पादन विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करुन त्यांनी स्वत: पथकासाेबत हरंगुळ (बु.) परिसरातील एमआयडीसी येथे असलेले हाॅटेल अक्षय बारवर बुधवारी धाड मारली. यावेळी गाेवा निर्मितीची विदेशी दारु आणि गुन्ह्यात वापरलेली माेटारसायकल (एम.एच. २४ बी.एम. ३२६४) असा एकूण ९४ हजार ५६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी हनुमंत नाथराव लाेहारे (३७ रा. गाेपाळवाडी, कारेपूर ता. रेणापूर) याला अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत हरंगुळ (बु.) येथील शामनगर येथे असलेल्या एन्जाॅय हाॅटेलवर धाड टाकण्यात आली. यावेळी गाेवा निर्मिती असलेली दारु व इतर दारु आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन (एम.एच. २४ ए.एच. ३२५४) असा एकूण ४ लाख ७७ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत रवी नामदेव सावंत (रा. व्यंकटेश नगर), लक्ष्मण मसू शिखरे, ऋषीकेश सवासे, बाळासाहेब ताड आणि शंभू भांगे (सर्व रा. बारानंबर पाटी, लातूर) यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अधीक्षक गणेश बारगजे, निरीक्षक राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक एस.टी. कुबडे, दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, मंगेश खारकर, हनुमंत मुंडे, सुरेश काळे, कपिल गाेसावी, एकनाथ फडणवीस यांच्या पथकाने केली.