राजकुमार जोंधळे
लातूर : तालुक्यातील चांडेश्वर शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला असून, झुडपात पाेत्यामध्ये लपवून ठेवलेला (३ किलाे ६७० ग्रॅम) असा एकूण १ लाख २८ हजार ४५० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. यावेळी एकाला अटक केली आहे. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात तिघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील चांडेश्वर शिवारातील गट नंबर १६९ येथील झुडपामध्ये गांजा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पाेत्यात लपवून ठेवलेला गांजा पाेलिस पथकाने जप्त केला. यावेळी एकाला अटक करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य यांनी दिलेल्या तक्रारीवरून काशिनाथ गोविंद चव्हाण, (वय ६०, रा. हसाळा, ता. औसा) याच्यासह अन्य दाेघांविराेधात लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काशिनाथ चव्हाण याला अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोउपनि. शैलेश जाधव, राजाभाऊ सूर्यवंशी, नितीन कठारे, रवी कानगुले, तुराब पठाण, सचिन धारेकर, सचिन मुंडे, चंद्रकांत केंद्रे, सदानंद योगी, संपत फड यांच्या पथकाने केली आहे. तपास पोउपनि. पाटील करीत आहेत.