मुंबई: मुंबईच्या अंधेरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. बारमध्ये पोलिसांनी छापा टाकून १७ बारबालांची सुटका केली. मेकअप रुममध्ये असलेल्या सीक्रेट रुममध्ये तरुणींना लपवण्यात आलं होतं. त्यांना शोधून काढण्यासाठी पोलिसांना तब्बल १५ तास लागले. महिलांना लपवण्यात आलेल्या सीक्रेट रुममध्ये खाण्यापिण्याची सोय होती. तिथे एसीदेखील होता.
अंधेरीतील बारमध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन होत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती. बारमध्ये खूप गर्दी असते. बारबालांमुळे बार रात्रभर सुरू असतो. मात्र स्थानिक पोलिसांना याबद्दल कोणतीही कल्पना नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी समाजसेवा शाखेला मिळाल्या. त्यानंतर शनिवारी रात्री पोलिसांनी बारवर छापा टाकला.
पोलिसांना छापेमारीत एकही बारबाला सापडली नाही. त्यानंतर पोलिसांनी बाथरुम, स्टोरेज रुम, किचनसह अन्य ठिकाणी शोध घेतला. मात्र बारबाला आढळून आल्या नाहीत. पोलिसांनी कित्येक तास बारमधील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मात्र हाती काहीच लागलं नाही. सकाळ होताच समाजसेवा शाखेचे डीसीपी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पुन्हा एकदा शोध सुरू झाला.
पोलिसांना मेकअप रुममध्ये एक संशयास्पद आरसा मिळाला. पोलिसांनी हातोड्यानं आरसा फोडला. त्यामागे एक दरवाजा होता. तो रिमोटनं कंट्रोल केला जायचा. पोलिसांनी दरवाजा उघडताच त्यातून एका पाठोपाठ एक बारबाला बाहेर पडल्या. सीक्रेट रुममध्ये एकूण १७ बारबाला होत्या. या प्रकरणी पोलिसांनी २० जणांविरोधात तक्रार दाखल केली असून बार सील केला आहे.