चंडीगड - पंजाबमधील ज्येष्ठ आयएएस अधिकारी संजय पोपली यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक केल्यानंतर विजिलेंस ब्यूरोनं शनिवारी त्यांच्या राहत्या घरी धाड टाकली. या धाडीत त्यांच्या स्टोअर रुममधून १२ किलो सोने, ३ किलो चांदी, ४ Apple आयफोन, १ सॅमसंगचा फोल्ड फोन आणि २ स्मार्टवॉच जप्त करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे.
पोपली यांच्या घरात १२ किलो सोन्यापैकी ९ किलो विट, ४९ सोन्याची बिस्किटे, १२ सोन्याचे सिक्के यांचा समावेश आहे. तर ३ किलो चांदीमध्ये १ किलोच्या ३ विट, १८ चांदीचे सिक्के सापडले आहेत. आयएएस अधिकारी संजय पोपली यांना नवाशहर सीवरेज पाइपलाइन योजनेतील निविदेला मंजुरी देण्यासाठी ७ लाख रुपये लाच आणि १ टक्के कमिशन मागितल्याच्या आरोपाखाली २० जूनला अटक करण्यात आली होती. तर त्यांचा सहकारी संदीपला जालंधरमधून पकडलं.
विजिलेंस ब्युरोचे प्रवक्ते म्हणाले की, संजय पोपली यांच्या जबाबावर पथकाने त्यांच्या घरावर छापा मारला. या धाडीत घरच्या स्टोअर रुममध्ये लपवून ठेवण्यात आले सोने, चांदी आणि मोबाईल फोन सापडले. सध्या विजिलेंस ब्युरो पोपली यांच्या अन्य ठिकाणच्या मालमत्तेची चौकशी करत आहे. तपासावेळी पोपली यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत त्यामुळे मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. पोपली यांच्या घरातून कोट्यवधीचं सोनं जप्त करण्यात आल्यानंतर आता तपास पथकाच्या निशाण्यावर त्यांच्या जवळची काही माणसं आहेत.
लवकरच पोपली यांच्या निकटवर्तीयांच्या घरावरही छापे टाकले जाणार आहेत. त्याठिकाणीही काळी संपत्ती सापडेल असा अंदाज अधिकाऱ्यांना आहे. याआधी आयएएस अधिकारी संजय पोपली यांच्या घरी कारतूसांचा साठा जप्त करण्यात आला. जवळपास ७३ कारतूस सापडली. २ हत्यारंही सापडली. सध्या विजिलेंस ब्युरो या प्रकरणी आणखी चौकशी करत आहे.
छापेमारी दरम्यान मुलाचा मृत्यूविजिलेंस ब्युरो संजय पोपली यांच्या घराची झाडाझडती घेत होते तेव्हा त्यांचा २६ वर्षीय मुलाचा गोळी लागून मृत्यू झाल्याचं कळालं. पोलिसांच्या मते, छापा मारताना त्या मुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. तर कुटुंबाने या प्रकरणी पोलिसांवर आरोप केला आहे.