शहरातील जुन्या दूध डेअरी परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी धाड टाकून कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांसह विविध राज्यातील दहा पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले. मुख्य चौकात गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे समाधान व्यक्त होत आहे.
नंदुरबारातील बसस्थानक ते जुनी दूध डेअरी परिसरात अवैध कुंटणखाना सुरू होता. या भागातून विद्यार्थी, सामान्य नागरिक, बाजार समितीत येणारे शेतकरी येत असतात. येथूनच खाजगी लक्झरी बसेस या पुणे, मुंबईसाठी सुटतात. अशा मुख्य चौकात हा प्रकार सुरू असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अखेर पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी थेट कारवाई केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
एलसीबीच्या पथकाने जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील परिविक्षा अधिकारी व संरक्षण अधिकारी यांना सोबत घेऊन बसस्थानकाच्या आजूबाजूला सापळा लावला. एक पंटर ग्राहकास तेथे पाठविले. पंटर ग्राहकाने दोन महिलांशी बोलणी करून त्या महिलांना रोख रक्कम दिली. बातमीची खात्री झाल्याने पथकाने छापा टाकून कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले. त्या ठिकाणी असलेल्या रूमची पाहणी केली असता वेगवेगळ्या राज्यांमधून पैसे घेऊन अनैतिक व्यापार करण्यासाठी आणलेल्या दहा पीडित महिला मिळून आल्या. नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.