लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगणाजवळच्या मोंढा येथील आदित्य बार ॲन्ड रेस्टॉरंटमध्ये चालणाऱ्या डान्स बारवर छापा घातला. बार मालकाने त्यावेळी पोलिसांपासून सर्व झाकझूक केली. मात्र, सीसीटीव्हीच्या फुटेजवरून डान्स बारचे बिंग फुटले. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी रविवारी सात जणांवर गुन्हा दाखल केला.
शहरापासून दूर एकांतस्थळी आरोपी नीलेश संतोषकुमार सिंग अनेक वर्षांपासून हा बार चालवितो. तेथे नेहमी गुन्हेगारांची वर्दळ असते. बारमध्ये गीत-गझलचा परवाना आहे. मात्र, त्या नावाखाली तेथे डान्स बार चालविला जातो, अशीही माहिती पोलिसांना मिळाली होती. ५ फेब्रुवारीच्या रात्री तेथे अशीच गुंडांची पार्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी रात्री तेथे छापा घातला. पोलीस आल्याचे कळताच बार मालकाने आतमध्ये सर्व सामसूम केले. पोलिसांना तेथे कुख्यात गुंड नव्वा उर्फ मारोती वलके, राजेश पांडे, गिरीश कनोजिया आणि प्रदीप उके आढळले. त्यावरून पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता उपरोक्त आरोपी बारमधील गायक महिलांवर नोटा उधळत असल्याचे आणि त्या ठुमके लावत असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी रविवारी या प्रकरणात हिंगणा ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. बारचा परवाना सरलादेवी संतोषकुमार सिंग यांच्या नावावर आहे. आरोपी नीलेश संतोषकुमार सिंग हा तो बार चालवतो. तर तेथे सीमा विक्रम चाैधरी ही तरुणी व्यवस्थापक आहे. त्यांनाही या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बनविले.
नीलेशला अटक, एक दिवसाचा पीसीआर
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संचालक नीलेशला आज अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे तसेच सहायक आयुक्त रोषन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक सुनील चव्हाण, सहायक निरीक्षक समाधान बजबळकर, फाैजदार मोहन शाहू, वसंता चौरे, हवलदार महेश फुलसुंगे, विनोद देशमुख, हेमंत लोणारे, सुनील नंदेश्वर यांनी ही कामगिरी बजावली.