मीरा रोड : ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणारा बारबालांचा अश्लील नाच आणि त्यावर मद्यपींकडून केली जाणारी नोटांची उधळण, अशी सर्वसाधारण स्थिती असताना, मीरा रोडच्या एका ऑर्केस्ट्रा बारवरील छाप्यात मात्र पोलिसांना केवळ २० रुपयांच्या २७ नोटाच सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या धाडीत ५४० रुपयांची रक्कम जप्त करून बार कर्मचारी व बारबालांसह १५ जणांना पकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात जुजबी कलमे लावल्याचे आरोप होत आहेत. अमली पदार्थविरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे, सहायक निरीक्षक कुटे व पथकाने २९ नोव्हेंबरच्या रात्री मीरा रोडच्या शीतलनगरमधील यश ९ या ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला. त्यावेळी मंद प्रकाशात चार महिला तोकडे कपडे घालून गाण्याच्या तालावर अश्लील हावभाव करून मद्यपान करीत असलेल्या पुरुषांच्या आजूबाजूला नृत्य करून पुरुष ग्राहकांना उत्तेजित करीत होत्या. बारच्या गल्ल्याची झडती घेता, त्यात २० रुपये किमतीच्या २७ नोटा असे ५४० रुपये मिळून आले. गायिकेच्या नावाखाली अश्लील नाच करणाऱ्या बारबाला, एक व्यवस्थापक, एक रोखपाल, सहा वेटर आणि तीन पुरुष गायक-वादक अशा १५ जणांना बारमधून पकडण्यात आले.३० नोव्हेंबर रोजी तेजश्री यांनी दिलेल्या फिर्यादीत हा प्रकार नमूद असून मीरा रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्या १५ जणांसह बारचा चालक व मालक अशा एकूण १७ जणांना आरोपी केलेले आहे. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करताना जुजबी कलमे लावली आहेत. महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण आदी कायद्याची कलमे लावलेली नाहीत. इतक्या मोठ्या ऑर्केस्ट्रा बारमधून केवळ ५४० रुपयेच पोलिसांना सापडल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारवाईबाबत सामान्यांनी संशय व्यक्त केला आहे.
nऑर्केस्ट्रा बारमध्ये ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दोन हजार वा ५०० च्या नोटांचे सुटे म्हणून १०, २० आदी रुपयांच्या कडक कोऱ्या करकरीत नोटा दिल्या जातात. कारण या नोटा नाचणाऱ्या बारबालांवर उधळल्या जातात. त्यांचे हारसुद्धा असतात.n त्यामुळे बारमधून केवळ ५४० रुपयांची रोकड आणि त्याही फक्त २० रुपयांच्या नोटा सापडल्याने पोलिसांच्या या धाडीवर किती भरोसा ठेवायचा, असा प्रश्न केला जात आहे.