मुंबई - चेंबूर परिसरात बसून टेलिफोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भारतीय लष्कराची जम्मू -काश्मीरमधली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्पाय नेटवर्कवर छापा टाकण्यात आला आहे. लष्कराचे एक पथक आणि मुंबईपोलिसांच्या क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत एका व्यक्तीला जेरबंद करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेवरुन भारतीय लष्कराची जम्मू काश्मीरमधील माहिती व सैन्यदलाच्या हालचालींविषयी गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. समीर कादर अल्वारी (३८) असं अटक आरोपीचं नाव असून तो गोवंडी येथील शिवाजी नगर येथे राहणार आहे.व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (Voip) या तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. या छाप्यादरम्यान मुंबई पोलीस आणि लष्कराच्या पथकाने महत्वाच्या गोष्टी जप्त केल्या आहेत. ३ चायनिज सिमकार्ड, याव्यतिरीक्त १९१ सिमकार्ड, लॅपटॉप, मोडेम, अँटेना, बॅटरी आणि कनेक्टर असे सामान हस्तगत करण्यात आले आहे. चायनिज सिमकार्ड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आवाज बदलून व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल या तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतीय लष्कराची माहिती मिळण्याचा प्रयत्न सुरु होता.पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आणि लष्कराने केलेल्या या कारवाईनंतर तपास यंत्रणा याप्रकरणी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा असलेल्या ISI चा सहभाग आहे का याचा तपास करत आहेत. भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जम्मू -काश्मीरमध्येही सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या या कारवाईत खूप मोठे धागेदोरे हाती लागू शकतात. अटक केलेल्या व्यक्तीकडून पोलीस अशा प्रकारची स्पाय नेटवर्क अजून किती ठिकाणी कार्यरत आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. यापूर्वीच अशाच गुन्ह्यात भिवंडी येथील भोईवाडा पोलिसांनी समीर सह पाच जणांना अटक केलेली होती. त्याच गुन्ह्यात समीर हा जामिनावर होता. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. समीरने सिमबॉक्सच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील अनेक कॉल ट्रान्सफर केलेले होते. ते कॉल विदेशातून आल्याचे समोर आल्याने या समीरसह त्याच्या सहकाऱ्यांचे आंतर राष्ट्रीय टोळीशी किंवा दहशतवादी संघटनेशी संधान आहे काय? याचा शोध पोलीस पथक घेत आहे.
अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल; महिला पोलीस अधिकाऱ्याचा केला होता अपमान