लातूर : उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी शेतात छापा मारुन एकाला अटक केली असून, त्याच्याकडून १ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने बुधवारी केली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून, औसा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील येळी शिवारात उसाच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती खबऱ्यामार्फत पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने माहितीची खातरजमा करुन बुधवारी येळी शिवारातील एका शेतात छापा मारला. यावेळी नारायण संतराम साठे (रा. येळी ता. औसा) याला ताब्यात घेण्यात आले. साठे यांच्या मालकीच्या शेतात बेकायदेशीरपणे गांजाच्या झाडाची लागवड केली हाेती. दरम्यान, छाप्यामध्ये १५ गांजाची झाडे आढळून आली. घटनास्थळाचा पंचासमक्ष पंचनामा करुन १८ किलाे गांजा असा एकूण १ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत औसा पाेलीस ठाण्यात नारायण साठे याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई औसा पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक शंकर पटवारी, पाेलीस उपनिरीक्षक घाेरफडे, सहायक फाैजदार रामराव चव्हाण, पाेलीस अंमलदार मुक्तार शेख, सूर्यवंशी, दंतुरे, महेश मर्डे, समीर शेख, भारत भुरे, डांगे, भागवत, गाेमारे यांच्या पथकाने केली आहे.