नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी (एनएचएआय) संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी देशभरात २२ ठिकाणी छापे टाकून ९ किलो सोने आणि १.१ कोटींची रोकड जप्त केली, तसेच एनएचएआयच्या नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १३ अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांत सरव्यवस्थापक, प्रकल्प संचालक, व्यवस्थापकासह नऊ अधिकारी आणि काही खाजगी व्यक्तींसह १३ जणांविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. महामार्गाच्या तीन प्रकल्पांसाठी २००८-१० दरम्यान दरमहा लाच घेतल्यावरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.२००८-०९ दरम्यान सुरत- हाजिरा पोर्ट, किशनगढ-अजमेर- ब्यावर आणि वाराणसी- अहमदाबाद या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे काम एनएचएआयने खाजगी कंपन्यांच्या एका समूहाला दिले होते. तीन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी एक उपकंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यात आली होती, असे सीबीआयचे प्रवक्ते आर.सी. जोशी यांनी सांगितले. या प्रकल्पांच्या अमलबजावणी दरम्यान एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी खाजगी कंपन्यांकडून पैसे घेतले. हे पैसे त्यांनी खाजगी कंपन्यांच्या उपठेकेदारांना दिले आणि या कंपन्यांनी आपल्या खात्यात घोळ केला. याप्रकरणी दिल्ली, राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह देशभरात २२ ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Corruption: भ्रष्टाचारप्रकरणी २२ ठिकाणी छापे, ९ किलो सोने, १.१ कोटींची रोकड जप्त; नऊ अधिकाऱ्यांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 8:44 AM