डोंबिवली - सध्या ऑनलाईन माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले असताना बजाज फायनान्स कंपनीच्या नावाने कर्ज देण्याच्या बहाण्याने आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणा-या दोघांना डोंबिवलीतील बनावट कॉल सेंटरवर धाड टाकून अटक करण्यात आली आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली असून दिनेश मनोहर चिंचकर आणि रोहीत पांडुरंग शेरकर अशी अटक आरोपींची नावे आहेत.
नांदेड जिल्ह्यातील सायबर सेलच्या महिला पोलीस उप निरीक्षक अनिता चव्हाण यांच्याकडे फसवणूक झालेल्या काही जणांनी तक्रारी केल्या होत्या. संबंधितांना ज्या मोबाईल क्र मांकावरून कॉल आले त्याचा तपास करता लॉकडाऊन कालावधीत कॉल सेंटरचे कामकाज एकाच ठिकाणी चालू न ठेवता वेगवेगळया ठिकाणी चालू असल्याचे समोर आले. दरम्यान नांदेड येथून उपलब्ध झालेल्या माहीतीनुसार कल्याण गुन्हे अन्वेषण विभागानेही मोबाईल लोकेशन वरून शहरातील बहुतांश कमर्शिअल कॉम्प्लेक्स असलेल्या ठिकाणी 15 ते 20 दिवस पाळत ठेऊन बनावट कॉल सेंटरचा थांगपत्ता शोधून काढला. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेंढरकर महाविद्यालयाच्या नजीक असलेल्या सिटी मॉल मध्ये हे कॉल सेंटर असल्याचे आढळून आले. नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीनुसार संबंधित बनावट कॉल सेंटरवर इतवारा आणि कल्याण गुन्हे शाखेने संयुक्तपणे कारवाई केली. यात चिंचकर आणि शेरकर यांना अटक करण्यात आली.
18 ते 20 कर्मचारी नोकरीस ठेवून हे दोघे उत्तर प्रदेश राज्यातील काही सहका-यांच्या मदतीने बनावट कॉल सेंटर चालवीत असल्याचे चौकशीत समोर आले. त्यांनी मोबाईल क्रमांकाचा ऑनलाईन डाटाबेस मिळवून नोकरीवर ठेवलेल्या कर्मचा-यांना प्राप्त मोबाईल क्रमांकाच्या डाटाबेस मधील क्रमांकावर फोन करण्यास लावून बजाज फायनान्स कंपनीमार्फत लोन मिळवून देतो असे सांगून लोकांना कर्ज पास करणो करिता आगाऊ रक्कम भरण्यात लावून फसवणूक केली आहे. या ठिकाणाहून 26 मोबाईल, एक लॅपटॉप, अनधिकृतरित्या मिळवलेला मोबाईल क्र मांकाचा डाटाबेस, इतर कागदपत्र असा एकूण 1लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या ठिकाणी नोकरी करणा-या कर्मचा-यांची चौकशी सुरू असल्याची माहीती पोलीसांनी दिली.