सोलापूर : शहरातील पाच कत्तलखान्यावर धाडी टाकून डांबून ठेवण्यात आलेल्या ३३ जनावरांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी जनावरांना गोरक्षकांच्या मदतीने अहिंसा गोशाळेत पाठवून दिले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विजापूर वेस येथे काही जनावरे कत्तलीच्या हिशोबाने ठेवण्यात आले असल्याची माहिती बजरंग दलातील कार्यकर्त्यांना मिळाली होती. कार्यकर्त्यांनी ही माहिती पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांना दिली. पोलिस उपायुक्तांनी फौजदार चाडवडी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना संबंधित ठिकाणी धाड टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या माहितीप्रमाणे शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान विजापूर वेस येथे धाडी टाकल्या. धाडीत त्यांना पाच वेगवेगळ्या कत्तलखान्यावर जनावरांच्या कत्तलीसाठी ठेवण्यात आलेले जनावरे आढळून आले. जनावरे डांबून ठेवण्यात आले होते.
पोलिसांनी ३३ जनावरांना ताब्यात घेतले. सर्व जनावरे महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागाच्या वाहनातून बाहेर काढण्यात आले व त्यांची रवानगी अहिंसा गो शाळेत करण्यात आली. जनावरे डांबून ठेवणाऱ्यांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई यशस्वी करण्याकरिता सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष गायकवाड, सह. पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, मानद पशु कल्याण अधिकारी महेश भंडारी, फौजदार चावडी पोलिस स्टेशन व जेलरोड पोलिस स्टेशनचे कर्मचारी, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पार पाडली.