मीरा रोड - मीरा भाईंदर महापालिकेने भाईंदर पूर्वेला बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या बनवणाऱ्या एका कारखान्यावर धाड टाकून १ हजार किलो तर एका टेम्पो मधून दिड हजार किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला आहे.
महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या कडे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या तसेच डेब्रिज वर सार्वजनिक आरोग्य विभागा कडून कारवाई होत नसल्याच्या तक्रारी सतत येत होत्या. उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांना कारवाईचे सतत निर्देश देऊन देखील कारवाई केली जात नसल्याने आयुक्तांनी त्यांच्या कडून सार्वजनिक आरोग्य विभागाचा पदभार काढून घेत तो उपायुक्त अजित मुठे यांच्याकडे सोपवला.
मुठे यांनी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक पिशव्यां विरोधात धफक कारवाई सुरू करत प्लास्टिक पिशव्या आढळल्यास स्वच्छता निरीक्षकांना जबाबदार धरून कारवाईचा इशारा दिला आहे. त्यानुसार गेल्या गुरुवार पासून प्लास्टिक पिशव्यांवर कारवाईला सुरवात झाली आहे. स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड, फेरीवाला पथक प्रमुख रणजित भामरे यांच्या पथकाने दुचाकीवर फिरून प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या शिल्पा चोपडे ( ३५ ) रा. पेणकरपाडा या महिलेस हाटकेश भागात पकडले. ती दुचाकीवर प्रेस लिहून सर्वत्र बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विकत होती. तिच्या कडून १८० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तिची दुचाकी जप्त करून मीरारोड पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदर पूर्वेच्या विशाल इंडस्ट्रीयल इस्टेट, गोडदेव या ठिकाणी तर बंदी असूनही प्लास्टिक पिशव्या उत्पादित केल्या जात असल्याची माहिती मुठे यांना मिळाली. त्यांच्या निर्देशा नुसार पालिका पथकाने प्लास्टिक पिशव्या उत्पादक कारखान्यावर धाड टाकून तेथून १ हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व दंड वसूल करण्यात आला.
सोमवारी सकाळी महापालिकेचे स्वच्छ्ता अधिकारी राजकुमार कांबळे, स्वच्छता निरीक्षक कांतीलाल बांगर व रमेश घरत, मुकादम देवेंद्र भोईर, कुमार पाटील, संतोष बोनकर, प्रकाश घरत यांनी प्रभाग ३ मधिल नवघर मार्गावरील एका टेम्पोमधून अंदाजे दिड हजार किलो प्लास्टिक जप्त करून दंड वसूल केला.प्रभाग ४ मध्ये स्वच्छता निरीक्षक रवी पाटील यांनी अंदाजे ११० किलो प्लास्टिक पकडले. स्वच्छता अधिकारी संदीप शिंदे, स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड यांच्या पथकाने १६ किलो प्लास्टिक जप्त करून १५ हजार एवढा दंड वसूल केला.
मीरा रोड,नयानगर परीसरात स्वच्छता निरीक्षक नितीन खैरे, श्रीकांत पराडकर व शाम चौगुले यांनी मात्र फक्त १० किलो प्लास्टिक जप्त करून ४ हजार इतका दंड वसूल केला. स्वच्छता निरीक्षक पेडवी यांनी ८ किलो प्लास्टिक जप्त करत ५ हजार दंड वसूल केला. परंतु भाईंदर पश्चिमेस निळकंठ उदावन आदींनी मात्र कारवाई कडे दुर्लक्ष चालवले आहे. पालिकेने गेल्या ४ दिवसात सुमारे दिड लाखांचा दंड वसूल केला आहे.