मडगाव - रेल्वेच्या ई तिकेट विक्री च्या काळाबाजाराचा येथील रेल्वे सुरक्षा दलाने पर्दाफाश करताना गोव्यातील मडगाव येथील एका दुकानावर छापा मारुन 2 लाख 60हजार रुपये किंमतीची एकूण 119 ई तिकीटेजप्त केली व दोघाजणांच्या मुसक्या आवळल्या. मडगावच्या मोबाईल वर्ल्ड या दुकानातून रेल्वेच्या ई तिकिटाचा काळाबाजार होत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून त्या दुकानावर छापा टाकून दुकानमालक अजरून गिरवोळी (23) व त्याचा भागीदार रिषी मिश्र (26) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे लॅपटॉप,मोबाईल, व अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या. मागाहून संशयिताना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. बोगस एजंट खाजगी युजर्स आयडीचा वापर करुन या तिकिटांचे आरक्षण करीत होते. मागाहून दुप्पट दराने ती ग्राहकांना विकली जात होती. अशा पध्दतीने तिकिटे घेणो हा रेल्वे कायदय़ांतर्गत गुन्हा आहे. प्रत्येक तिकिटामागे संशयित अंदाजे पाचशे रुपये जादा रक्कम ग्राहकांकडून घेत होते असेही तपासात आढळून आले.ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत देशभरात अशा बोगस एजंटविरुद्ध कारवाई सुरु करण्यात आली असून, शहरात मडगाव तसेच लगतच्याभागात रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणारे रॅकेटच कार्यरत असल्याचा रेल्वे सुरक्षा दलांना संशय आहे. या गैरव्यवहारात सामील असलेल्यावर लवकरच कारवाई होण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गोव्यात रेल्वेच्या ई-तिकिट विक्रीचा पर्दाफाश, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 9:26 PM