मुंबई - राज्यसभेत पाकिस्तानविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारने काही महिन्यांपूर्वी कलम ३७० हटवल्यानंतर संजय राऊतांनी राज्यसभेत कलम ३७० हटविणे म्हणजे एका भस्मासूराचा वध केल्यासारखे असून एका सैतानाला मारण्यासारखे आहे. गेली ७० वर्षांपासून आपला देश एक डाग घेऊन चालत होता. तो डाग आज धुवून निघाला असल्याचे भाषण केले आणि अमित शहांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर राऊत यांच्याविरोधात पाकिस्तानात पोस्टर्स लागले होते. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याने संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांच्याभोवती आता 11 जवानांचं कडं असणार आहे.
राज्यसभेत संजय राऊत यांनी केलेल्या या भाषांचे पडसाद देशातच नाही तर पाकिस्तानात देखील उमटले होते. पाकिस्तानात राऊत यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे राऊत यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांना आता वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. वाय प्रकारात १ किंवा २ कमांडो आणि पोलीस कर्मचार्यांसह ११ जवानांचे सुरक्षा कवच असते. दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांचाही (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर - पीएसओ) यामध्ये समावेश होतो.