सोमवारी रात्री मुंबई गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अटक केली आहे. त्याच्यासोबतच त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थार्प याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज कुंद्रासोबतच अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील अडचणीत आली आहे. राज कुंद्राच्या कंपन्यांमध्ये किंवा त्याच्या पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये शिल्पा शेट्टीचा हात आहे किंवा नाही याची देखील सखोल चौकशी होणं अपेक्षित आहे. मात्र अद्याप शिल्पा शेट्टीची चौकशीची गरज भासत नसून तिला समन्स बजावण्याची आवश्यता नसल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. तसेच या प्रकरणात अजून काही लोकांना अटक होईल अशी शक्यता देखील नसल्याचं त्यांनी पुढे सांगितले.
त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टीला मोठा दिलासा दिला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, रोवा आणि तिचा पती दीपंकरने हॉटहीट वेबसाइट तयार केली होती. यात दीपंकर हा सहसंचालक आहे. त्यांनी यावरून अनेक पॉर्न व्हिडीओ शेअर केले आहेत. तर दुसरीकडे गहनाने परदेशस्थित कंपनीला विविध अश्लील फ़िल्म पाठवून लाखोंची कमाई केली. यात तिचे भारतातील काम पाहणारा उमेश कामत पथकाच्या हाती लागला. तो उद्योजक राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याच्या अटकेनंतर कुंद्रा तपास यंत्रणाच्या रडारवर आले. त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर सोमवारी त्यांच्याकड़े चौकशी करण्यात आली. चौकशीअंती सोमवारी रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. आज त्याला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.