राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. यासह या प्रकरणात आणखी बरीच नावेही जोडली जात आहेत. दरम्यान, सोमवारी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने या प्रकरणात अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा हिला समन्स बजावले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता पॉर्नोग्राफीप्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यासाठी गुन्हे शाखेने शर्लिनला बोलावले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या रडारवर असलेल्या मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांनी अटक पूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आज मुंबई हायकोर्टाने या दोघींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हायकोर्टाने असे म्हटले आहे की, 20 सप्टेंबर 2021 पर्यंत या दोघींवर कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही. तसेच आज आज दुपारी अडीच वाजता कुंद्रा यांच्या बेकायदेशीर अटकेला आव्हान देणारी याचिका आणि खालच्या कोर्टाचा आदेश रद्दबातल करण्याच्या याचिकेवर सुनावणी देखील पार पडणार आहे.यापूर्वी रविवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अभिनेत्री-मॉडेल गहाना वसिष्ठ हिच्यासह तीन जणांना चौकशीसाठी बोलावले होते. याआधी शुक्रवारी राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीवरही गुन्हे शाखेने सहा तास चौकशी केली. दररोज या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील धागेदोरे केवळ मुंबईशीच नव्हे तर कानपूरमध्येही जोडले गेले आहेत, ज्याची चौकशी केली जात आहे.
14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत राहणार राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अद्यापही दिलासा मिळालेला नाही. आता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. राज कुंद्राला किला कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. याच बरोबर राज कुंद्राच्या वकिलांनी त्याच्या जामीनासाठी अर्ज केला आहे. चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता राज कुंद्राला जामीन मिळावा, असा या अर्जाचा आधार आहे.