मुंबई - पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात दोषी आढळल्याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना काल रात्री अटक केली. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. (Raj kundra arrest) राज कुंद्रा याच्याविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पोर्नोग्राफीक कंटेट बनवल्याच्या आणि तो अॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. अशा प्रकरणात आरोपीविरोधात आयटी अॅक्ट आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंद होतो. तसेच गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला दोषी ठरवले गेले तर त्याला अनेक वर्षे तुरुंगात राहावे लागू शकते. (Raj Kundra has been arrested in a pornography case, If convicted, he could face up to seven years in prison)
पोर्नोग्राफी आणि पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी आपल्या देशात कायदे खूप कडक आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यात आयटी अॅक्टसोबतच भारतीय दंडविधान (आयपीसी) च्या अनेक कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंद होतो. इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर अशा प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयटी अॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती.
इंटरनेटच्या वापराबरोबर अश्लिलतेचा व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये लैंगिक कृती आणि नग्नतेवर आधारित फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट, ऑडिओ आणि इतर साहित्याचा समावेश होतो. अशा प्रकारचा कंटेट इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित करण्यावर किंवा कुणाला पाठवल्यास त्याच्यावर अँटी पोर्नोग्राफी लॉ लागू होतो. दुसऱ्या व्यक्तीचे नग्न किंवा अश्लिल व्हिडीओ तयार करणे किंवा असा एमएमएस बनवणारे, अन्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणारे लोक या कायद्यांतर्गत येतात.
या कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये आयटी (दुरुस्ती) कायदा २००८ च्या कलम ६७(ए), आयपीसीचे कलम २९२, २९३, २९४, ५०० आणि ५०९ अन्वये शिक्षेची तरतूद आहे. गुन्ह्याच्या गांभीर्याच्या दृष्टीने पहिल्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दहा लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास ही शिक्षा ७ वर्षांपर्यंत वाढू शकते.