लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याने पॉर्न बिझनेस बंद होऊ नये म्हणून हॉटशॉट ॲप बंद झाल्यास प्लान बी तयार केला होता. यात, पॉर्न फिल्मचे शूटिंग थांबवून त्याच्या ‘बॉलिफेम’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मॉडेल आणि अभिनेत्रींकडून लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याची तयारी त्याने केली होती. राज कुंद्रा याच्या व्हायरल व्हॉट्सॲप चॅटमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यातून कोट्यवधींची उलाढाल सुरू होती. मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.
या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या उमेश कामतच्या चौकशीतून कुंद्रा याचे अनेक राज बाहेर आले. कामतने गुुन्हे शाखेला दिलेल्या माहितीत लंडनस्थित असलेल्या केनरिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक प्रदीप बक्षी हे राज कुंद्रा याचे भाऊजी आहेत. राज कुंद्रा याने ५ फेब्रुवारी २०१९ रोजी भागीदारीत आर्म्स प्राइम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन करून केनरिन कंपनीसाठी हॉटशॉट हे ॲप विकसित केले. पुढे जुलै ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत हे ॲप २५,००० डॉलर किमतीला केनरिन कंपनीला विकले. कुंद्रा याच्या सांगण्यावरून कामत हा केनरिन प्रायव्हेट कंपनीचा भारतातील को-ऑर्डिनेटर म्हणून कुंद्रा याच्या कंपनीच्या कार्यालयातून याचे कामकाज पाहत होता. पुढे, ११ डिसेंबर २०१९ रोजी कुंद्रा याने या कंपनीचा राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीचा कर्मचारी रायन थॉर्प हा हॉटशॉट ॲपबाबत माहिती घेत होता. याच ॲपवरून पॉर्न फिल्म प्रसारित करण्यात येत होत्या.
गुगल प्लेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हॉटशॉट डिजिटल ॲप्लिकेशन १८ नोव्हेंबरला बंद केले. मात्र, चॅटमधील मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांनी असे काही झाल्यास प्लान बी यापूर्वीच तयार ठेवला होता. पॉर्न फिल्मचे शूटिंग थांबवून त्याच्या ‘बॉलिफेम’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मॉडेल आणि अभिनेत्रींकडून लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याची तयारी त्याने केली होती.
कोट्यवधी कमावल्याचा संशय
कुंद्राने पॉर्न फिल्म आणि वेबसीरिज बनविण्यासाठी अर्थपुरवठा केला आहे. एक पॉर्न फिल्म बनविण्यासाठी पाच ते सात लाख रुपये खर्च येत होता. पुढे या माध्यमातून राज कुंद्रा याने कोट्यवधी रुपये कमावल्याचा पथकाला संशय आहे.