औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेत १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला १६ अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये अटी शर्तीं भंग करणे हा गुन्हा आहे. कलम १५३ अन्वये दोन समूहात भांडण लावणे, ११६ कलमाखाली गुन्हा करण्यासाठी मदत, कारावासाच्या शिक्षेस पात्र गुन्ह्यास उत्तेजन देणे आणि 117कलमाखाली गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण करणे, भारतीय दंड संहितेच्या कलम 117 नुसार, जो कोणी सामान्य लोकांद्वारे किंवा दहापेक्षा जास्त व्यक्तींच्या संख्येने किंवा कोणत्याही समुदायाद्वारे गुन्हा करण्यास मदत करणे, या गुन्ह्यास दंड आणि ३ वर्ष पर्यंत शिक्षेची तरतूद आहे.