राज्यसभा खासदार किरोरी लाल मीणा यांच्या आरोपानंतर आयकर (आयटी) विभागाने रविवारी पुन्हा जयपूरच्या गणपती प्लाझावर छापा टाकला. आयटी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी प्लाझा येथील लॉकरमधून 2.46 कोटी रुपये जप्त केले आहेत. लॉकरमध्ये 500 रुपयांच्या नोटा भरल्या होत्या.
आतापर्यंत IT अधिकार्यांनी 761 लॉकर्स तपासले असून, 339 लॉकर्स तपासणे बाकी आहे. आयटी अधिकार्यांनी सांगितलं की, मंगळवारी त्यांनी तीन लॉकर तपासले आणि त्यात 1.25 कोटी रुपये रोख आणि 1 किलो सोने सापडलं. शनिवारी आणखी दोन लॉकर्सची तपासणी केली असता त्यात मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली.
या कागदपत्रांच्या आधारे लॉकर मालकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय काही लॉकर आहेत ज्यांचे नाव आणि पत्ता गायब असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. जोपर्यंत सर्व लॉकर मालक येऊन त्यांचे लॉकर उघडत नाहीत तोपर्यंत तपास सुरूच राहणार असल्याचं आयकर अधिकाऱ्यांनी सांगितलं. जयपूरमधील गणपती प्लाझाच्या आत सुमारे 1100 लॉकर्स आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.