राजस्थानातील जोधपूर(Jodhpur) येथे अनियंत्रित ऑडी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांमध्ये घुसली. या घटनेत जवळपास 8 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. (Jodhpur Audi Car accident)
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, यात दिसत आहे, की एका भरधाव ऑडी कारने आधी स्कूटीवर असलेल्या तरुणीला मागून धडक दिली. धडकेनंतर, स्कूटीवरील मुलगी हवेत उडली गेली आणि जमिनिवर पडली. ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यानंतर, ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांत घुसली. या घटनेत एकूण 9 जण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने अनेक दुचाकींना धडक दिली. अमित नागर (५०), असे कार चालकाचे नाव आहे. तो शास्त्रीनगर पोलीस ठाण्याच्या नंदनवन ग्रीन परिसरातील रहिवासी आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी जोधपूरच्या चौपासनी हाऊसिंग बोर्ड पोलीस ठाणे हद्दीतील एम्स रोडवर एक मोठा अपघात झाला. यात आलिशान कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांमध्ये घुसली. यात एकाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवेदन जारी करत, ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच 'घटना दुर्दैवी असून, जखमींचे प्राण वाचविण्याला आमचे प्राधान्य आहे,' असेही गेहलोत यांनी म्हटले आहे.