भरतपूर : भाजपाच्या भरतपूरच्या खासदार रंजिता कोळी (MP Ranjeeta Koli) यांच्या घरावर पुन्हा एकदा हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. खासदार रंजिता कोळी यांच्या घराबाहेर हल्लेखोरांनी तीन राऊंड गोळीबार केला. हल्ल्याच्या या घटनेनंतर खासदार रंजिता कोळी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी रंजिता कोळी यांच्या घराबाहेर त्याचा फोटो चिकटवला आणि त्यावर क्रॉसचे चिन्ह काढले आहे. यासोबतच जीवे मारण्याची धमकी देणारे पोस्टरही चिकटवण्यात आले आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना तीन रिकामी काडतुसे सापडली आहेत. मात्र, अद्याप हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बयाना येथील खासदार रंजिता कोळी यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११.४५ वाजता घडली. येथे हल्लेखोरांनी त्याच्या घरावर तीन राऊंड गोळीबार केला. त्यानंतर त्यांचा फोटो गेटबाहेर लावून त्यावर क्रॉस चिन्ह काढले. या फोटोसोबत हल्लेखोरांनी खासदार रंजिता कोळी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्रही चिकटवले आहे. या हल्ल्याच्या घटनेमुळे रंजिता कोळी यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पत्रात अपशब्द वापरत धमकीखासदार रंजिता कोळी यांच्या घरावर चिकटवलेल्या धमकीच्या पत्रात हल्लेखोरांनी हा केवळ ट्रेलर असल्याचे म्हणत अपशब्द वापरले आहेत. तसेच, पुढच्या वेळी बुलेट आत असेल, असे म्हटले आहे. हल्लेखोरांनी रंजिता कोळी यांना पळून जाण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचा स्पष्ट इशारा देत तुला वाचवायला कोणी येणार नाही, असेही म्हटले आहे. दरम्यान, हल्ल्याच्या या घटनेनंतर बयाना शहरात खळबळ उडाली आहे.
याआधीही प्राणघातक हल्लारंजिता कोळी पहिल्यांदाच भरतपूरच्या खासदार झाल्या आहेत. त्या भरतपूरच्या राजकीय घराण्यातील आहेत. रंजिता कोळी यांचे सासरे गंगाराम कोळी हे दोन वेळा भरतपूरचे खासदार राहिले आहेत. पाच महिन्यांपूर्वीही रंजिता कोळी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी रंजिता कोळी रुग्णालयांची पाहणी करून परतत होत्या. त्यादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मंगळवारीही भरतपूरहून जनसुनावणी आटोपून त्या आपल्या घरी परतल्या होत्या.
सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध सुरूपोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तेथून रिकामी काडतुसे जप्त केली. तसेच, याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलीस पाहत आहे. अद्यापपर्यंत आरोपींचा शोध लागलेला नाही. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत दोनदा खासदारावर हल्ला झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.