राजस्थानच्या भरतपूर येथील भाजपा खासदार रंजीता कोली यांच्या गाडीवर गुरुवारी रात्री काही अज्ञातांनी हल्ला केला आहे. रंजीता कोली या एका सामूहिक आरोग्य केंद्रांचं निरिक्षण करण्यासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी धरसोनी गावात काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यात खासदाराच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. तर खासदारांनाही किरकोळ दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.
खासदार रंजीता कोली यांना हल्ल्यानंतर तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमधून उपचारानंतर त्या शासकीय विश्रामगृहात गेल्या. काही दिवसापूर्वी खासदारानं कोरोना आकडेवारी लपवल्याचा आरोप राज्य सरकारवर केला होता. खासदारांसोबत असलेल्यांनी सांगितलं की, हा हल्ला खूप भयंकर होता. हल्ल्यानंतर खासदार बेशुद्ध पडल्या. घटनेनंतर पोलिसांना संपर्क केला परंतु पोलीस घटनास्थळी ४५ मिनिटांनंतर पोहचले. तर भरतपूर जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार फोन केल्यानंतरही त्यांनी फोन उचलला नाही.
कोरोना चाचणी कमी होत असल्यानं पत्र लिहिलं होतं.
खासदार रंजीता कोली यांनी ३ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पत्र लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की, भरतपूर मतदारसंघात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी कमी होत आहे. चाचण्या कमी झाल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या किती आहेत त्याचे योग्य आकलन होत नाही. दिवसाला किमान ५ हजार आरटीपीसीआर चाचणी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यासोबत भरतपूर जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी लपवू नका असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला होता.