राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नगरसेवकाच्या वाढदिवसाच्या पार्टीत डान्सर तरुणींचा काँग्रेस नेत्याच्या मुलाने आणि त्याच्या मित्रांनी विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
विनयभंगाचे हे प्रकरण राजस्थान येथील बुंदीच्या तळेदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले. रविवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत हा सर्व प्रकार घडला.
आरोपींनी अश्लील कृत्य करत डान्सरचा विनयभंग केल्याचा आरोप तक्ररदाराने केला आहे. यावेळी डान्सरने विरोध केला असता आरोपीने तिला धक्काबुक्की करत तिच्या गळ्यातील सोनसाखळी आणि दोन मोबाईल हिसकावले. त्यामुळे तेथील वातावरण बिघडले. यानंतर सर्व डान्सरांनी पळ काढला. दरम्यान, हिसकावलेल्या मोबाईलमध्ये डान्सरतचा वैयक्तिक डेटा अपलोड केल्याने आरोपीने तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची शक्यता असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
'८० हजार पोलीस काय करत आहेत, अमृतपाल प्रकरणात यंत्रणा अपयशी'; हायकोर्टाने पंजाब पोलिसांना फटकारलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेदा पोलीस स्टेशन हद्दीतील बलोप गावात असलेल्या एका फार्म हाऊसवर काँग्रेस नगरसेवकाच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या बर्थडे पार्टीमध्ये परफॉर्म करण्यासाठी कोटा येथून ऑर्केस्ट्रा ग्रुप आला होता. यावेळी बुंदी जिल्ह्यातील एका नगरपालिकेच्या अध्यक्षांचा मुलगा राजू गुर्जरही आपल्या मित्रांसह या पार्टीत सहभागी होण्यासाठी आला होता. याठिकाणी राजू गुर्जर आणि कालू बरमुंडा यांनी त्यांच्या साथीदारांसह डान्सरसोबत अश्लील कृत्य करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या संचालकाने गुन्हा दाखल केला आहे.