नागौर:राजस्थानच्या नागौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज(सोमवार) नागौर न्यायालयाबाहेर दिवसाढवळ्या टोळीयुद्ध झाले. गोळीबारात कुख्यात गुंड संदीप विश्नोई उर्फ सेठी याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या आवाराबाहेर पोलिसांसमोर ही घटना घडली. संदीप विश्नोई याच नागौर कारागृहातच कैद होता.
नागौर पोलीस दुपारी संदीपसह न्यायालयात पोहोचले होते. यादरम्यान कारमधून आलेल्या शूटर्सनी गुंड संदीपला गोळ्या घालून ठार केले. गोळीबार करणारे हरियाणातील असल्याचे सांगण्यात येत आहे. नऊच्या सुमारास हल्लेखोरांनी गोळीबार केला. सर्व शूटर्स काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये आले होते. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी नागौर परिसरात नाकाबंदी केली आहे. संदीपचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
कोण होता संदीप विश्नोई?
संदीप विश्नोई हरियाणातील कुख्यात गुंड आणि सुपारी किलर होता. तो सेठी टोळीशी संबंधित होता. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो दारू तस्करीसोबत सुपारी घेऊन हत्याही करायचा. त्याने नागौर येथील एका व्यापाऱ्याची हत्याही केली होती. जुन्या वादातून संदीपची हत्या झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे.
3 वर्षांपूर्वी 30 लाखांची सुपारी घेतली होतीतीन वर्षांपूर्वी 29 नोव्हेंबर 2019 रोजी नागौर हत्याकांडात संदीप विश्नोईचे नाव प्रथमच समोर आले होते. चौकशीत महिलेने पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचल्याचे उघड झाले. या हत्येसाठी महिलेने संदीप विश्नोईला 30 लाखांची सुपारी दिली होती. या प्रकरणी गँगस्टर संदीप नागौर तुरुंगात होता.
गुंड राजू फौजीचा खास मित्रभिलवाडा येथे दोन हवालदारांची हत्या करणारा कुख्यात गुंड राजू फौजी आणि गँगस्टर संदीप विश्नोई हे खास मित्र होते. पोलिसांची हत्या करण्यासाठी संदीपनेच राजू फौजीला शस्त्रे पुरवली होती. आपली टोळी चालवण्यासाठी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीकडून शस्त्रे विकत घेतल्याचे संदीपने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले होते.