नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक हैराण करणारी घटना आता समोर आली आहे. अवघा 5 हजार पगार असलेल्या एका व्यक्तीचं कोटींचं साम्राज्य असल्याची माहिती मिळत मिळत आहे. राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडामधील शिक्षण विभागात अवघ्या 5 हजार रुपयांच्या पगारावर नोकरी करणारा कम्प्युटर ऑपरेटर कोट्यवधी असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षण विभागात करार तत्वावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याने तब्बल 2 कोटी 15 लाखांचा फ्रॉड करीत आपला व्यवसाय उभा केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, भीलवाडा जिल्ह्यातील कोटडी पंचायत समिती खेडा राजकीय विद्यालयात गोपाळ सुवालका नावाची एक व्यक्ती कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करीत होती. गोपाळ 2007 ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत फसवणूक करीत विभागाचे पैसे गायब करीत होता. मात्र कोणालाच याबाबत माहिती नव्हती. अत्यंत शिताफीने तो पैसे गायब करत असल्याने कोणालाच याबाबत काहीच कळलं नाही. तो शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बनावटी आयडी आणि पासवर्डने वर्षानुवर्षे विभागातील पैशांची अफरातफर करीत होता. ही सर्व रक्कम तो बायकोच्या बँक खात्यात जमा करीत असे.
पैशातून दोन घरं आणि एक जेसीबी मशीन खरेदी केली
गोपाळ सुवालकाने त्याची पत्नी दिलखूश सुवालकाला देखील खोटे कागदपत्र तयार करून शिक्षक बनवलं होतं आणि तो तिच्याच खात्यामध्ये सर्व पैसे ट्रान्सफर करत असे. या पैशातून त्याने दोन घरं आणि एक जेसीबी मशीन खरेदी केली होती. तसेच आरोपीने या पैशातून उभा केलेला वाहनांचा व्यवसाय पंजाबपर्यंत पसरला होता. कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करीत असताना तो कोट्यवधी झाला होता. स्वत: केवळ 5 हजार रुपयांची नोकरी करणाऱ्या या व्यक्तीने स्वत:च्या भाच्याला पीए म्हणून ठेवलं होतं.
आरोपीची पोलखोल झाली आणि 2 कोटी 15 लाखांचा फ्रॉड केल्याचं उघड
जेव्हा आरोपीचं पितळ उघड पडू लागलं तर त्याने सर्व रक्कम दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केली. या प्रकरणात कम्प्युटर ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षण अधिकारी योगेश पारीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम 12 ऑगस्ट 2021 शिक्षण अधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक राजपूत यांनी पोलीस ठाण्यात कम्पुटर ऑपरेटर विरोधात तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांनी गोपाळने 12 लाखांचा फ्रॉड केल्याचं म्हटलं होतं. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला तेव्हा आरोपीची पोलखोल झाली आणि तब्बल दोन कोटी 15 लाखांचा फ्रॉड केल्याचं उघड झालं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.