नवी दिल्ली - बिहाच्या हाजीपूरमधील एका लग्नाची गोष्ट आता समोर आली आहे. एका तरुणीने प्रेमविवाहानंतर आपल्या कुटुंबीयांना 'माझं त्या मुलावर खूप प्रेम आहे. त्यामुळे मला माझं आयुष्य जगू द्या' अशी विनंती केली आहे. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील तरुणीने सांगितलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर ही घटना चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कनिका सोनी असं या तरुणीचं नाव असून ती राजस्थानच्या हनुमानगढची रहिवासी आहे.
आपल्या घराजवळच राहणाऱ्या लकी नावाच्या तरुणाशी कनिकाचे प्रेमसंबंध होते. लकी हा जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. तरुणीच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन कनिका आणि लक्कीने 14 सप्टेंबर रोजी विवाह केला. कनिकाच्या कुटुंबीयांकडून राजस्थानपोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरुण-तरुणीच्या शोधात असलेले राजस्थानचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत बिहारमध्ये पोहचले, अनेक ठिकाणी त्यांनी या दोघांचा शोध घेतला.
घरात डांबून ठेवलं गेल्याचा आणि त्रास दिल्याचा आरोप
कनिकाने सोशल मीडियावर आपल्या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले. त्यानंतर हे जोडपं शनिवारी रात्री उशिरा हाजीपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालं. पोलिसांसमोर येण्यापूर्वी कनिकाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या वडिलाकडून आपल्याला घरात डांबून ठेवलं गेल्याचा आणि त्रास दिल्याचा आरोप केला. राजकीय ताकदीचा वापर करून आपल्याला त्रास दिला जात असल्याचंही कनिकाने या व्हिडिओत सांगितलं आहे.
"मी लकीवर प्रेम करते, त्याला सोडू शकत नाही"
राजस्थानचे गंगानगरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार निहालचंद मेघवाल हे आपले भाऊ असल्याचं कनिकानं म्हटलं आहे. तसेच आपण आपल्या मर्जीने आपण लग्न केलं असून सध्या आनंदात आहोत. त्यामुळे कुटुंबीयांना त्रास देणं बंद करण्याचं आवाहनही कनिकाने व्हिडिओमध्ये केलं आहे. "मी लकीवर प्रेम करते, त्याला सोडू शकत नाही" असंही तिने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियात या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर हे हायप्रोफाईल प्रकरण पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.