नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हुंड्यासाठी एका विवाहितेचा प्रचंड छळ करून तिला विष पाजल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सासरच्यांनी जबरदस्तीने विष पाजलं, बेदम मारलं आणि गुप्तांगात मिरची टाकण्याचा प्रयत्न केला असं तरुणीने म्हटलं आहे. मृत्यूपूर्वी तिने केलेल्या Video मधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. अडीच महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात ही भयंकर घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 एप्रिल रोजी भीलवाडा पोलिसांत कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल भैरू लाल यांची मुलगी प्रिया हिचं लग्न विक्रमसोबत झालं होतं. लग्नानंतर दोन-चार दिवसांतच प्रियाची सासू तिला हुंड्यासाठी त्रास देऊ लागली. सासरकडचे लोक तिला बेदम मारहाण करू लागले. प्रियाला इतकी मारहाण करण्यात आली की तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. रुग्णालयात जीवन आणि मरणाची लढाई लढत असलेल्या प्रियाने आपल्या एक व्हिडिओ तयार केला आणि सासरकडच्यांनी दिलेल्या त्रासाची संपूर्ण माहिती दिली.
प्रियाने मृत्यूपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये सासरची मंडळी आधी तिला जंगलात घेऊन गेले, तिचे कपडे काढले आणि यानंतर तिच्या गुप्तांगात मिरची टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने स्वतःची सुटका करत तिथून पळ काढला असं म्हटलं आहे. तसेच मृत्यूआधी प्रियाने सांगितलं की, सासरच्यांनी मला बेदम मारहाण केली. ते माझ्याकडे 6 लाख रुपये मागत आहेत. मात्र, माझ्याकडे त्यांना देण्यासाठी सहा हजार रुपयेही नाहीत. सासू आणि सासरकडच्या लोकांनी मला जबरदस्ती विष पाजलं आहे असं देखील प्रियाने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
विष देण्याआधी तिनं सांगितलं, की माझ्या मृत्यूला माझी सासू, सासरे आणि नणंद कारणीभूत आहे. त्यांनी रात्री मला मारहाण केली आणि माझे कपडेही फाडले. प्रियाचे वडील भैरू लाल यांचं असं म्हणणं आहे, की लग्नात त्यांनी सोनं-चांदीचे दागिने, फ्रिज, टीव्ही, कूलर, कपाट. डबल बेड आणि भांड्यांसह सर्व वस्तू दिल्या होत्या. मात्र, प्रियाची सासू मला 6 लाख रुपये मागू लागली. पैसे द्या आणि मुलीचा संसार चालू द्या असं तिनं म्हटलं. मात्र, या गोष्टीला नकार देताच त्यांनी प्रियाला मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.