राजस्थानमधील भिलवाडा येथून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एक प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीला भेटायला आला. जेव्हा महिलेच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना हे कळलं तेव्हा त्याने आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या प्रेयसीचे कपडे घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु गावकऱ्यांनी त्याला पकडलं. त्यानंतर लोकांनी त्याला बेदम मारहाण केली, दोरीने बांधलं आणि त्याचे केस कापले. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भिलवाडा जिल्ह्यातील मंडलगड पोलीस स्टेशन परिसरातील सरदारजी का खेडा गावात ही घटना घडली आहे, जिथे एक प्रियकर मध्यरात्री आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला, पण गावकऱ्यांनी त्याला जाताना पाहिलं. यानंतर गोंधळ उडाला आणि प्रियकर घाबरला. रात्रीच्या अंधारात प्रेयसीचा लेहेंगा आणि दुपट्टा घालून बाहेर आला पण गावकऱ्यांनी त्याला पकडलं. त्यानंतर त्याला काठीने जबर मारहाण करण्यात आली. मात्र, गावकऱ्यांनी त्यानंतर प्रियकराला दोरीने बांधलं आणि त्याचे केस कापले.
घटनेची माहिती मिळताच मांडलगड पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले जिथे ग्रामस्थांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. मंडलगड पोलीस स्टेशनचे प्रभारी जतिन जैन म्हणाले की, कुटुंब आणि ग्रामस्थांनी या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. प्रियकरानेही कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, परंतु व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची चौकशी केली जात आहे. यामध्ये काही लोक त्या तरुणाला मारहाण करताना आणि त्याच्यावर ओरडताना दिसत आहेत. या लोकांची चौकशी केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो तरुण महिलेच्या कपड्यामध्ये दिसत आहे आणि काही महिला आणि पुरुष त्याला मारहाण करत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, एक तरुण कात्रीने त्याचे केस कापत आहे. याच दरम्यान, तरुणाचे हातपाय दोरीने बांधलेले दिसत आहेत. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.