जयपूर: आत्तापर्यंत तुम्ही विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या अनेक टोळ्यांबद्दल ऐकलं असेल, पण तुम्ही कधी पोस्टमॉर्टम टोळीबद्दल ऐकलं आहे का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हे खरंय. एक नाही तर अशी अनेक प्रकरणे राजस्थानच्या दौसामधून समोर आली आहेत, जिथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. पण, या टोळीने बनावट पोस्टमार्टम अहवाल सादर करुन त्या लोकांच्या नावाने 10-10 लाख रुपयांचा क्लेम/विमा उचलला आहे. या बनावट पोस्ट मॉर्टम टोळीशी संबंधित 15 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वकील, पोलीस, डॉक्टर आणि कंपनीतील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये दिल्लीचा रहिवासी असलेल्या अरुण नावाच्या व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात तपास अधिकारी रमेश चंद, शवविच्छेदन करणारे डॉक्टर सतीश गुप्ता आणि वकील चतुर्भुज मीना यांनी अरुण जिवंत असूनही त्याचा अपघातात मृत्यू झाल्याचं दाखवलं. तसेच, बनावट पोस्टमॉर्टेम रिपोर्ट तयार करुन अरुणच्या नावाने दहा लाख रुपयांचा विमा उचलला. पण, नंतर तपासात अरुणचा मृत्यू झाला नसल्याचं आढळून आलं.
तपासात अनेक प्रकरणे बाहेर आली
अरुणच्या बनावट पोस्टमार्टमचे प्रकरण पोलिसांनी 2019 मध्येच उघड केले. या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर, पोलीस कर्मचारी, वकील यांना अटक केली होती. यानंतर पोलिसांना अधिक तपासात एक नाही तर अशीच अनेक प्रकरणे आढळून आली. या सर्व प्रकरणांमध्ये अपघात झाला नसला तरी कागदपत्रांमध्ये रस्ते अपघात दाखवण्यात आला आहे आणि त्या व्यक्तीला मृत असल्याचे सांगून बनावट शवविच्छेदन देखील करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणांची सीआयडी, सीबी आणि जयपूर रेंज आयजी कार्यालयाकडूनही चौकशी करण्यात आली. प्रदीर्घ तपासानंतर पोलिसांनी एकूण 3 प्रकरणांचा खुलासा केला आहे.
15 आरोपींना अटक इतरांचा शोध सुरू
पोलिसांनी या प्रकरणांमध्ये आरोपी डॉ. सतीश गुप्ता, पोलिस एएसआय रमेश चंद, वकील चतुर्भुज मीणा याच्यासह एकूण 15 जणांना अटक केली आहे. या तीन मुख्य आरोपींना 2019 मध्ये देखील अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर, जामिनावर बाहेर आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने व्हीआरएस घेतली तर डॉक्टर पुन्हा कामावर रुजू झाले. पण, आता पुन्हा एकदा पोलिसांनी त्याला इतर प्रकरणांमध्ये अटक केली आहे. अजूनही 8 आरोपी फरार आहेत, पोलिस त्यांचा शोध घेत आहे.