राजस्थानच्या पाली परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जाडन शाखेत एक धक्कादायक घटना घडली आहे. बँक लुटण्यात आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँक लुटल्याचं सीसीटीव्ही फुटेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हेल्मेट घातलेले दोन जण बंदुकीचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये लुटत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँकेतील सुमारे तीन लाख रुपये घेऊन हे दरोडेखोर फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, SBI बँकेची ही शाखा राष्ट्रीय महामार्ग पाली-सोजत दरम्यान आहे. पोलिसांना दरोड्याची माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. सध्या शहरभर नाकाबंदी करून हल्लेखोरांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाली जिल्ह्यातील शिवपुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी महेश गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बँक उघडली असता हेल्मेट घातलेले दोन दरोडेखोर आत शिरले आणि बँकेत उपस्थित असलेल्या लोकांना धमकावत जोरात आरडाओरडा केला. शाखेत उपस्थित असलेल्या लोकांना हात मागे ठेवा नाहीतर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली.
दोन दरोडेखोरांपैकी एकाकडे पिस्तूल, तर दुसऱ्याच्या हातात धारदार शस्त्र होते. दरोड्याच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून त्यात एक जण बँकेत पिस्तुल हातात घेऊन 3 लाख रुपये घेऊन फरार झालेला दिसत आहे. अवघ्या 50 सेकंदात त्यांनी ही बँक लुटली आहे. दरोडा टाकत असताना दरोडेखोरांनी बँकेत उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती देऊ नये म्हणून सर्वांचे मोबाईल टेबलावर ठेवण्यास सांगितले होते.
एसएचओ महेश गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली असली तरी अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही. पोलिसांची अनेक पथके आजूबाजूच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. यासोबतच दोन्ही दरोडेखोर मोटारसायकलवरून सोजतकडे जाताना दिसत आहेत. बँक कर्मचाऱ्यांना सोडताना दरोडेखोरांनी पोलिसांना न बोलावण्याची धमकी दिली. सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेजनुसार, दोन्ही दरोडेखोरांचे वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"