प्रेम करणाऱ्यांना त्यांच्या प्रेमात जर कुणाची सर्वात मदत होत असेल ती म्हणजे मित्रांची. मित्र त्यांच्यासाठी कधीही धावून येतात. कपल जर पळून जात असेल तर मित्रच त्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. मात्र राजस्थानमध्ये दोन भावांना प्रेम विवाह करण्यास मदत केल्यावरून तब्बल ३४ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड त्यांना जात पंचायतीने ठोठवला आहे.
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील ही घटना असून या दोघा भावांवर आरोप आहे, की त्यांनी प्रेमविवाह (Love Marriage) करण्यासाठी आपल्या नातेवाईकाला मदत केली (Fine For Helping a Girl In Love Marriage) आहे. त्यामुळे त्यांना जात पंचायतीने तब्बल ३४ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.
मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून आयोगाने बाडमेरच्या डीएमला या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. (हे पण वाचा : भयंकर! गर्लफ्रेंडला भेटणं जीवावर बेतलं, तिच्या कुटुंबीयांनी चोर समजून धू-धू धुतलं; तरुणाचा मृत्यू)
दरम्यान, या दोघांच्या चुलत भावाच्या मुलीनेही काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. तिला या दोघा भावांनी मदत केली होती. पंचायतीने या दोघांना याचीच शिक्षा दिली आहे. दुसरीकडे दोन्ही भावांचं याप्रकरणी म्हणणं आहे की, त्यांनी या मुलीला प्रेमविवाह करण्यासाठी मदत केलेली नाही.
पीडित खंगार सिंह राजपुरोहित आणि त्याच्या भावाने पंचायतीच्या सदस्यांविरोधात बाडमेरच्या सिवाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला की पंचायतीने दोन्ही भावांना प्रत्येकी १७-१७ लाख रुपयांचा दंड ठोठावला. मात्र त्यांनी दंड न भरल्यानं त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला.
या प्रकरणाबाबत पोलीस अधिकारी प्रेम राम म्हणाले की, पाच जणांवर आणि इतर काही अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दोषींवर कडक कारवाई केली जात आहे. कोणीही कोणावर सामाजिक बहिष्कार टाकू शकत नाही.