नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान अनेक ठिकाणी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. तसेच सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडाला आहे. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. धौलपूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये माजी आमदारही सहभागी झाले होते. भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र लोकांनी मोठी गर्दी केली.
भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये सरकारच्या वतीने लागू करण्यात आलेल्या कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, धौलपूर जिल्ह्यामध्ये भाजपाचे माजी आमदार सुखराम कोहली एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात कोरोना नियमांची पायमल्ली झाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कारवाई करायला सुरुवात केली. सुखराम कोहली यांच्यासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये वेगाने कोरोनाचा संसर्ग होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! स्वस्त इंजेक्शनवर Remdesivir चं खोटं लेबल; 700 जणांची फसवणूक, अनेकांचा जीव धोक्यात
कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे घेऊन तसेच काळाबाजार करून हे इंजेक्शन विकलं जात आहे. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे,. रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा असताना स्वस्त इंजेक्शनवर Remdesivir चं खोटं लेबल लावलं जात असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये तब्बल 700 जणांची फसवणूक करण्यात आली असून अनेकांचा जीव धोक्यात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना आतापर्यंत अटक केली आहे. एका स्वस्त इंजेक्शनवर हे रेमडेसिवीर इंजेक्शनचं खोटं लेबल लावत आणि ते तब्बल 15 ते 20 हजारांना विकत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अधिक तपासादरम्यान आरोपींनी 98 रुपयांच्या PPT 4.5 GM इंजेक्शनवर रेमडेसिवीरचं लेबल लाऊन 700 पेक्षा जास्त लोकांना ते विकून त्यांची फसवणूक केली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत जवळपास 4800 रुपये इतकी आहे.