झारखंडच्या धनबाद येथे एका औषध कंपनीचे माजी अधिकारी राजीव सिंह यांनी पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. राजीव यांनी आत्महत्येपूर्वी ६ मिनिटांचा व्हिडिओ बनवून पत्नी आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप लावला. मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओत पत्नी, सासरच्यांनी त्यांचा आणि आईचा छळ केल्याचा आरोप केला. त्याशिवाय चुलत भाऊ आणि त्याच्या पत्नीवरही अनेक आरोप केले आहेत.
ही घटना १९ मार्च रोजी घडली आहे. धनबादच्या बरटांड परिसरात राहणाऱ्या राजीव सिंह यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेच्या आधी त्यांनी सुसाईड नोटही लिहिली होती. राजीव यांच्या आईने सांगितले की, माझा मुलगा मोठ्या कंपनीत नोकरी करायचा. त्यामुळे घरात जास्त वेळ देऊ शकत नव्हता. ऑगस्ट २०२३ साली त्याने नोकरी सोडली. त्यानंतर त्याला पत्नीसोबत राहायचं होते, परंतु पत्नी, चुलत भाऊ आणि अन्य तिघांनी मिळून षडयंत्र रचत त्याला मानसिक छळ दिला. खोटे आरोप ठेवून त्याच्यावर दबाव आणला. मुलाचा फ्लॅट त्यांना नावावर करायचा होता असा आरोप आईने केला.
राजीवच्या मृत्यूनंतर त्याचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला. या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी पोलीस करत आहेत. राजीव व्हिडिओत सांगतात की, पत्नी अमृता सिंह, चुलत भाऊ सुजित कुमार सिंह, मेव्हणा राहुल शेखर, त्याची बायको अंशुमाली गुप्ता आणि सासरे शशी शेखर यांनी मिळून अशी परिस्थिती निर्माण केली ज्यामुळे मला हे जग सोडावे लागत आहे. मी माझी पत्नी आणि चुलत भावाच्या कर्माची फळे भोगत आहे. माझ्या पाठीमागे अमृता आणि चुलत भाऊ सुजितने समाजात न चालणारे कृत्य केले. या सर्वांनी मिळून मला आणि माझ्या आईला खोट्या खटल्यात अडकवले. या आरोपींना सोडू नका असं त्याने आवाहन केले.
दरम्यान, राजीव यांची आई सावित्री सिंह यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ५ जणांविरोधात आत्महत्येला प्रोत्साहन दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अलीकडेच पत्नी आणि तिच्या घरच्यांनी छळ केल्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. अतुल सुभाष या उच्चशिक्षित तरूणानेही पत्नीला कंटाळून आत्महत्या केली. सध्या उत्तर प्रदेशात सौरभची हत्या चर्चेत आहे. त्यात प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीचा काटा काढला.