राजगड
मध्यप्रदेशच्या राजगड पोलिसांनी एका धक्कादायक हत्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. आपल्या डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी पतीनं आपल्या पत्नीचा खून केला जेणेकरुन तिच्यावरील विम्याचे पैसे मिळवता येतील. धक्कादायक बाब अशी की पत्नीची हत्या करण्याआधीच पतीनं स्वत: पत्नीचा ३५ लाखांचा विमा काढला होता.
राजगड जिल्ह्यातील अॅडीशनल एसपी मनकामना प्रसाद यांच्या माहितीनुसार गेल्या २६ जुलै रोजी रात्री जवळपास ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जिल्ह्यातील भोपाळ रोड स्थित माना जोड गावातील महिला पूजा मीणा (२७) हिची गोळी मारुन हत्या करण्यात आली. पती बद्रीप्रसाद मीणा (३१) याच्यासोबत बाइकवर बसून जात असताना पूजा मीणा हिच्यावर गोळीबार करण्यात आला होता. पतीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यानं चार लोकांकडून कर्ज घेतलं होतं आणि कर्जदार वारंवार घरी येऊन परतफेडीसाठी दबाव टाकत होते.
पतीनं पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार तो जेव्हा पत्नीसोबत राष्ट्रीय महामार्गावरुन जात होता तेव्हा चार लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. पत्नी माझा बचाव करत असताना एकानं तिच्यावर हल्ला केला आणि गोळीबार करत फरार झाला. पोलिसांनी पतीनं दिलेल्या माहितीनुसार तक्रारीची नोंद केली आणि आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असतानाच त्यांना एक गोष्ट लक्षात आली की पतीनं आपल्या पत्नी पूजा हिचा काही दिवसांपूर्वीच विमा काढला होता. त्यानंतर पोलिसांना संशय आला आणि तपासाची चक्र फिरली. त्यानंतर पतीच खूनी असल्याचं दिसून आलं. पोलीस चौकशीत समोर आलं की आरोपीनं पत्नीची हत्या करण्यापूर्वी काही दिवस आधी तिचा विमा काढला होता. जेणेकरुन तिच्या मृत्यूनंतर पैसे मिळवता येतील.
असं गुपीत उघड झालं...पोलिसांना दिलेल्या जबाबात पतीनं घटनेच्या दिवशी जे घडलं त्याची जी कहाणी सांगितली त्यात त्यानं पत्नीवर समोरुन गोळीबार करण्यात आल्याचं सांगितलं होतं. पण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पूजा हिच्यावर पाठीमागून गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं. मग पोलिसांनी ज्या संशयित आरोपींना पकडलं होतं. त्यांचे कॉल डिटेल्स काढले असता चौघांपैकी एकही जण त्यादिवशी घटनास्थळाच्या आसपास नव्हता असं लक्षात आलं.
पोलिसांनी नंतर पतीचे कॉल डिटेल्स काढले आणि त्याचं गेल्या काही दिवसांपासून एका नंबरवर वारंवार संपर्कात होता. महत्वाची बाब म्हणजे घटनेच्या दिवशी तोच नंबर घटनास्थळाच्या ठिकाणीही अॅक्टीव्ह होता असं पोलिसांना कळालं. पोलिसांचा संशय खरा ठरला आणि त्यांनी पतीला खाकी इंगा दाखवल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीनं दिलेल्या कबुली जबाबानुसार, त्याच्यावर जवळपास ५० लाख रुपयांचं कर्ज होतं. त्यानं कर्जातून सुटका करण्यासाठी आधी आपल्या पत्नीचा ३५ लाखांचा अपघाती विमा काढला. त्यानंतर इंटरनेटवर व्हिडिओ पाहून पत्नीच्या हत्येचा कट रचला.
बाइक बंद पडल्याचा बनावस्वत:च्या पत्नीची हत्या करण्यसाठी त्यानं तीन गुंडांना ५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. यातील १ लाख रुपये त्यानं अॅडव्हान्स दिले होते. तर विम्याची रक्कम मिळताच उर्वरित चार लाख रुपये देणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं. पतीनं घटनेच्या दिवशी पत्नीसोबत जात इसताना बाइक खराब झाल्याचा बनाव केला आणि पत्नीला रस्त्याच्या कडेला बसवून बाइक दुरुस्त करत असल्याचं नाटक करू लागला. त्यानंतर सुपारी दिलेले गुंड तिथं पोहोचले आणि पूजा हिच्यावर गोळीबार करुन ते पसार झाले.
दोन आरोपींना अटकचौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी बद्री यानं त्याचे सहकारी अजय उर्फ गोलू, शाकिर आणि हुनरसिंह यांच्यासोबत मिळून हे हत्याकांड रचलं. सध्या आरोपी बद्रीप्रसाद आणि हुनरसिंह हे कुरावर पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर इतर आरोपी शाकिर आणि गोलू यांचा शोध पोलीस घेत आहेत.