उदयपूर - राजस्थानातील उदयपूरमधील भूपालपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील फताहपुरा भागातील जननी सुरक्षा केंद्रात कोरोनाची लस देण्याच्या नावाखाली एका तरुणाची नसबंदी करण्यात आली. याची माहिती मिळताच पीडित तरुणाने भूपालपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे.
2000 रुपयांची लालूच दाखवून नेलं अन्... - भूपालपुरा पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, उदयपूर येथील प्रतापनगर भागातील गुरुद्वाराजवळ राहणारा बाबुलाल गमेती हा मजुरीसाठी घरातून बाहेर पडला होता. तो एका ठिकाणी कामासाठी वाट पाहत होता. यानंतर हिरणमागरी सेक्टर 5 मधील रहिवासी नरेश चावत त्यांच्याकडे आला आणि कोरोनाची लस देण्यासाठी दोन हजार रुपयांची लालूच दाखवत तो त्याला स्कूटीवरून घेऊन गेला. आरोपी नरेशने त्याला फतेहपुरा येथील रुग्णालयात नेले. तेथे त्याला इंजेक्शन देण्यात आले, यानंतर तो बेशुद्ध झाला. मिळालेल्या माहितीनुसार, येथे त्याची नसबंदी करण्यात आली.
अद्याप मूल नाही -ऑपरेशननंतर आरोपीने पीडित कैलासला त्याच्या बहिणीच्या घरी सोडले. दोन हजारांऐवजी त्याला केवळ 1100 रुपयेच दिले आणि फरार झाला. पीडित कैलाशच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बाबुलाल हा त्यांचा एकुलता एक मुलगा असून, विवाहित आहे. परंतु त्याला अद्याप मूलबाळ नाही. यामुळे आता त्यांना त्यांच्या नात आणि नातवाचा चेहरा कसा दिसणार? यामुळे त्याची आणि त्याच्या आईची चिंता वाढली आहे. पोलिसांनी फसवणूक आणि एससी एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.