गल्लेबोरगाव : खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील हारदे गल्लीत राहणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष यांच्यावर चोरट्यांना हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१८) मध्यरात्री २:१० वाजता घडली आहे. राजू आसाराम हारदे (५२) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगावतील हारदे गल्लीत राजू हारदे राहतात. ते राहत असलेल्या आजूबाजूच्या सात ते आठ घराच्या चोरट्यांनी बाहेरून कड्या लावल्या होत्या. यानंतर चोरट्यांनी राजू हारदे यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरामध्ये त्यांची पत्नी व ते दोघेच झोपलेली होती. दरवाजा तोडण्याच्या आवाजामुळे ते दोघी जागी झाली व दरवाजाकडे आली दरवाजाकडे येताच चोरट्यांनी त्यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला. यावेळी त्यांच्या पत्नीने माझ्या नवऱ्याला मारु नका अशी विनंती केली मात्र चोरट्यांनी राजू हारदे यांच्या पोटात व डोक्यात चाकूने वार केले. यात ते जमिनीवर पडले. हे पाहून त्यांच्या पत्नीने आरडओरड केली मात्र शेजाऱ्यांच्या घराच्या काड्या बाहेरून लावल्यामुळे कोणीही धावत आली नाही. त्यातच शेजारी राहणारे एका जणांनी घराचा दरवाजे तोडून बाहेर आले. त्यामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला.
शेजारी राहणाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी दवाखान्यात पाठवले पण उपचार दरम्यान आज सकाळी सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, यांनी देखील तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन आरोपींचा कसून शोध घेण्याच्या दृष्टीने तपास यंत्रणा सुरु केली आहे.
श्वानपथक, ठसेतज्ञ यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून तपास यंत्रणेला मदत केली. यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गल्लेबोरगाव सह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.