मुंबई- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे. आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. सदर प्रकरणावर अनेक कलाकारांनी आपलं मत व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
सतत हसतोय अन् म्हणतोय एकाच गोष्टीचाच पश्चाताप वाटतोय; आफताबचा पोलिसांना जबाब
सदर प्रकरणावर आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी देखील भाष्य केलं आहे. तिच्या आत्म्यानं परत यावं आणि त्याचे ७० तुकडे करावेत, असं म्हणत राम गोपाल वर्मा यांनी संताप व्यक्त केला आहे.
केवळ कायद्याच्या भीतीने क्रूर हत्या रोखता येत नाहीत. पण त्या घटनेचा बळी ठरलेल्या व्यक्तीच्या आत्म्यानं परत येऊन मारेकऱ्यांना मारले तर ते नक्कीच हे थांबवता येईल. देवाने याचा विचार करावा आणि आवश्यक ते करावे ही विनंती, असंही राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने चौकशीदरम्यान सांगितले की, श्रद्धाने त्याला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकले होते, त्यानंतर दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. तसेच लग्नाच्या बहाण्यानं श्रद्धाला आफताब दिल्लीत घेऊन गेला होता. अनेक दिवस उलटल्यानंतर श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावल्यामुळे आपण कंटाळून तिची हत्या केल्याची कबूली दिली.
श्रद्धाने आफताबला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकलं अन्...; मोठं गूढ उलघडलं!
श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना अद्याप तीन प्रमुख पुरावे सापडण्याची प्रतीक्षा आहे. श्रद्धाची हत्या केली ते शस्त्र, तिचे शिर आणि मोबाईल हे ते तीन पुरावे. दरम्यान, आफताबच्या स्वयंपाकघरातून पोलिसांना रक्ताचे डाग सापडले आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
श्रद्धाच्या मृतदेहाचे १२ तुकडे सापडले-
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल.
फोटोला ‘हॅपी डेज’ कॅप्शन-
श्रद्धा वालकर इन्स्टाग्रामवर फारशी सक्रिय नव्हती. तिच्या हत्येच्या एक आठवडा आधी, तिने हिमाचल प्रदेशमध्ये स्वतःचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र पोस्ट केले होते. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी तिने आफताबसोबत एक फोटो पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले ‘’हॅपी डेज’’. आफताबसोबत तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा एकमेव फोटो होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"