मुंबई : 'तांडव' वेब सिरीजमधील काही दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आमदार राम कदम यांनी पोलीस ठाण्याबाहेरच ठीय्या आंदोलन केले. बुधवारी कदम यांच्या तक्रारीवरून घाटकोपरपोलिसांनीतांडवमधील अभिनेता सैफ अली खानसह संबंधित कलाकाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तांडव या वेब सिरिजमध्ये आक्षेपार्ह देखावे आणि संवादामुळे हिंदू देव देवतांची विटंबाना केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मुंबईसह ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर देखील तांडव विरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी दोन दिवस आंदोलन सुरु होते. अखेर बुधवारी राम कदम यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी तांडवच्या समूहा विरोधात गुन्हा दाखल केला आला आहे. यात आरोपीमध्ये अभिनेता सैफ अली खान, अली अब्बास जफर, हिमांशु कृष्णा मेहरा, गौरव सोलंकी, अपर्णा पुरोहीत, अमित अग्रवाल तसेच वेब मालिकेतील अन्य कलाकार यांच्या नावाचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली आहे.