रोहतक: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची आज सकाळीच पॅरोलवर सुटका झाली. रोहतक सुनारिया जेलमध्ये तो शिक्षा भोगत आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता तो तुरुंगाबाहेर आला. उत्तर प्रदेशच्या बागपत येथील डेरा सच्चा सौदाच्या डेऱ्यावर गेला असण्याची शक्यता आहे.
सुनारिया जेलबाहेर त्याला नेण्यासाठी हनीप्रीत आणि गुरमीतच्या कुटुंब पोहोचले होते. त्याला एका महिन्याचा पॅरोल मिळाला आहे. राम रहीम तिथे गेल्याने डेऱ्याबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यामुळे आतमध्ये कोणालाही जाऊ दिले जात नाहीय. राम रहीमला याआधी २१ दिवसांची संचित रजा देण्यात आली होता. पोलीस निरीक्षक डीके त्यागी यांनी सांगितले की, बरनावा डेराच्या आजुबाजुला सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे.
गुरमीत राम रहीमवर दोन साध्वींवर लैंगिक शोषण केल्याचा आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. हे आरोप सिद्ध झाल्याने तो सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. गुरमीत राम रहीमला सुनारिया तुरुंगातून नेण्यासाठी त्याची कथित मुलगी हनीप्रीत देखील आली होती. उत्तर प्रदेश म पोलिसांनी राम रहीमच्या सुरक्षेबाबत न्यायालयाला एनओसी दिली होती. यामुळे त्याला यूपीमध्ये राहण्याच्या अटीवर पॅरोल देण्यात आला आहे.