तुरुंगातून बाहेर आलेला राम रहीम खरा की खोटा, प्रकरण पोहोचले हायकोर्टात... नेमकं काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 08:08 PM2022-07-04T20:08:58+5:302022-07-04T20:21:10+5:30
Ram Rahim came out From Jail : आम्हाला खात्री आहे की, बाबा राम रहीमला बदलले आहे. यावेळी बागपतच्या आश्रमात जो राम रहीम आहे तो खोटा, डुप्लिकेट आहे.
एकच व्यक्ती दोन ठिकाणी उपस्थित राहू शकते का? असाच दावा पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात एका व्यक्तीने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम यांच्याबाबत केला होता. सोमवारी या रंजक प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. गुरमीत राम रहीमच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती की, गुरमीत राम आजकाल जो व्हिडिओ जारी करत आहे तो खोटा असून खरा गुरमीत राम रहीमचे अपहरण करण्यात आले आहे.
या खटल्याची सुनावणी करताना न्यायाधीश म्हणाले की, कदाचित वकिलाने वैज्ञानिक कथा असलेला चित्रपट पाहिला असेल. या प्रकरणात, खटला मागे घेतला जाईल किंवा फेटाळला केला जाईल. न्यायालयाने म्हटले की, राम रहीम 17 जूनला 21 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला, मग त्याचे अपहरण कसे झाले? अशा प्रकरणांची सुनावणी घेण्यासाठी न्यायालय तयार केलेले नाही. त्याचवेळी हरियाणा सरकारने सांगितले की, राम रहीमला कडक सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचे अपहरण होणे शक्य नाही. दोन अनुयायांवर झालेल्या बलात्कार प्रकरणात राम रहीम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
न्यायाधीशांनी वकिलाला सांगितले की, या प्रकरणी याचिका मांडताना त्यांनी किमान मनाचा वापर केला असता. मानवी क्लोनिंग शक्य आहे का? हे सर्व वर्तमानपत्र आणि टीव्हीवर चालू आहे. फिल्मी बोलू नका. यानंतर हायकोर्टाने राम रहीमची याचिका खोटी ठरवून फेटाळून लावली.
या प्रकरणी मीडियाशी बोलताना गुरमीत राम रहीमचे प्रवक्ते आणि वकील जितेंद्र खुराना म्हणाले की, अशा प्रकारे याचिका करून डेरा सच्चा सौदाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हेच लोक अशी याचिका करून डेरा सच्चा सौदाच्या इतर प्रकरणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाणार असले तरी आम्ही याप्रकरणी लक्ष घालू.
येथे राम रहीम संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे अशोक कुमार म्हणाले की, याचिका फेटाळल्यानंतर आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. आम्ही आता तेथे याचिका दाखल करू. आम्हाला खात्री आहे की, बाबा राम रहीमला बदलले आहे. यावेळी बागपतच्या आश्रमात जो राम रहीम आहे तो खोटा, डुप्लिकेट आहे.