मागील दशकापासून १ कोटीचं बक्षीस असणारा माओवादी नेता पोलिसांच्या तावडीतून वाचत होता परंतु आता त्याच्या पत्नीमुळे त्याला जीव गमवावा लागला आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या ७ प्रमुख सदस्यांपैकी एक चलपती कायम सतर्कता बाळगत पोलिसांपासून पळत होता. मात्र पत्नीसोबत घेतलेल्या एका सेल्फीमुळे सुरक्षा जवान त्याच्यापर्यंत पोहचले. ओडिशा-छत्तीसगड सीमेवर सुरू असलेल्या मोहिमेत चलपती नावाने ओळखल्या जाणाऱ्या रामचंद्र रेड्डीला त्याच्या १३ साथीदारांसोबत ठार करण्यात आले आहे.
चलपतीने २००८ साली ओडिशात नयागड जिल्ह्यातील माओवादी हल्ल्याचं नेतृत्व केले होते ज्यात १३ सुरक्षा जवान शहीद झाले होते. नक्षलविरोधी अभियानात सहभागी एका अधिकाऱ्याने सांगितले की, १५ फेब्रुवारी २००८ साली हल्ल्याचं षडयंत्र चलपती रामकृष्ण रेड्डीने रचलं होते. रामकृष्ण आता मारला गेला. रामचंद्र रेड्डी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी होता. तो छत्तीसगड आणि ओडिशात कार्यरत होता. मागील काही दशकापासून तो छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील दरभा येथे राहत होता. वाढत्या वयामुळे त्याला जास्त प्रवास करता येत नव्हता.
शाळेत न जाताही तो तेलुगु, हिंदी, इंग्रजी आणि उडिया भाषेत बोलायचा. जंगलात राहताना त्याची ओळख आंध्र ओडिशा बॉर्डर स्पेशन झोनल कमिटीची डिप्टी कमांडर अरुणा उर्फ चैतन्या व्यंकट रवीशी झाली. तिने चलपतीसोबत लग्न केले. चलपतीला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील होते परंतु तो तावडीत सापडायचा नाही. मात्र अरुणासोबत घेतलेल्या एका सेल्फी फोटोमुळे त्याची ओळख पटली. त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
दरम्यान, मे २०१६ साली आंध्र प्रदेशातील नक्षलवादी आणि सुरक्षा यंत्रणेतील चकमकीवेळी या कपलचा फोटो स्मार्टफोनमध्ये सापडला होता. घटनास्थळावरून नक्षली पळून गेले परंतु यानंतर चलपतीने त्याची रणनीती बदलली. तो पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. यातच सोमवारी रात्री छत्तीसगड आणि ओडिशा जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहिम हाती घेण्यात आली. सकाळपर्यंत २ नक्षलींना ठार करण्यात आले. मंगळवारी सकाळपर्यंत १२ आणखी नक्षलवादी मारले गेले. सुरक्षा जवानांच्या चकमकीत १४ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. ज्यात १ कोटी बक्षीस असलेल्या चलपतीचाही समावेश होता.