औरंगाबाद : चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी गुरुवारी (दि.६) औरंगाबादच्यान्यायालयात ‘कॉपीराईट कायद्यांतर्गत’ दाखल एका दाव्यात हजेरी लावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांच्या आदेशानुसार दंडाची रक्कम जमा करून त्यांच्याविरुद्ध जारी केलेले ‘अजामीनपात्र अटक वॉरंट’ रद्द करून घेतले. यापुढील सुनावणीस हजर राहण्याची हमी त्यांनी न्यायालयाला दिली. या दाव्याची पुढील सुनावणी २० आॅक्टोबर २०१८ ला होणार आहे.
काय होते प्रकरण नूतन कॉलनीतील रहिवासी मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन (६५) यांनी तक्रार दिली होती. त्यांनी रामगोपाल वर्मा यांच्यावर कथा चोरीचा आरोप केला होता. तक्रारीनुसार त्यांनी ‘जंगल में मंगल’ नावाची कथा लिहिली होती. त्या कथेवर रामगोपाल वर्मा यांनी ‘अज्ञात’ नावाचा चित्रपट तयार केला. २००९ मध्ये अज्ञात हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो चित्रपट तयार करण्यापूर्वी वर्मा यांनी आपली परवानगी न घेता किंवा ‘कॉपीराईट’चे हक्क न घेता ‘अज्ञात’ चित्रपट तयार केला, असे मुश्ताक यांचे म्हणणे आहे. मुश्ताक यांनी २०१० मध्ये औरंगाबादच्या न्यायालयात वर्मा यांच्याविरुद्ध ‘खाजगी दावा’ दाखल केला होता. वर्मा यांनी कॉपीराईट कायद्याच्या कलम ५१ चा भंग केला. म्हणून त्यांना याच कायद्याच्या कलम ६३ नुसार शिक्षा व्हावी, अशी विनंती मुश्ताक यांनी केली होती.
या गुन्ह्यात वर्मा यांना जामीन मिळाला होता. वर्मा यांनी १२ जून २०१८ रोजी दाखल केलेला हजेरी माफीचा अर्ज न्यायालयाने नामंजूर करून अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. अज्ञात चित्रपटाची कथा नीलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांची आहे. त्यांच्याच कथेवर हा चित्रपट तयार केल्याचे रामगोपाल वर्मा यांचे म्हणणे आहे.